तालुकास्तरीय स्पर्धेत सेजल सातपुते प्रथम, तर ईश्वरी शिंदे तृतीय
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बुद्धिबळ स्पर्धेत सबाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठान संचलित पब्लिक स्कूल, वाळुंजच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले असून, त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही स्पर्धा नुकतीच ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, धनगरवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत नगर तालुक्यातील अनेक शाळांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये इयत्ता 10 वीतील विद्यार्थिनी सेजल सातपुते हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर इयत्ता 8 वीची विद्यार्थिनी ईश्वरी शिंदे हिने तृतीय क्रमांक मिळवला. दोन्ही विद्यार्थिनींची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
या यशाबद्दल विद्यार्थिनींना खुडे सरांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्या तसेच सर्व शिक्षक व पालकांनी दोन्ही विजयी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.