भारतीय समाज व्यवस्थेचा कणा असलेल्या कुटुंब विषयावर वाळुंज पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन
नात्यांतील प्रेम, आपलेपणा आणि जिव्हाळ्याचे सादरीकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय समाज व्यवस्थेचा कणा असलेला व भावी पिढीवर संस्कार रुजविणाऱ्या कुटुंब या विषयावर वाळुंज (ता. नगर) पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलन फक्त मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमापुरते मर्यादीत न राहता मुलांमध्ये कुटुंबातील विविध नात्यांतील प्रेम, आपलेपणा आणि जिव्हाळा निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कुटुंबातील विविध नाते सांस्कृतिक कार्यक्रमातून उलगडून विद्यार्थ्यांनी भारतीय एकत्र कुटुंब पध्दतीचे दर्शन घडविले.
गणेश वंदनेने कार्यक्रमाची सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. आईचे प्रेमळ गीत, कबाड कष्ट करुन मुलांना जीवनात उभे करणारे वडिल यांच्यावर बहारदार गीतांचे सादरीकरण करण्यात आले. तर मुलांना संस्कार देणाऱ्या घरातील आजी-आजोबांचे गीतांसह विविध नाते व्यक्त करणाऱ्या गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. तर यावेळी मुला-मुलींनी लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारीसह मर्दानी खेळाच्या धाडसी प्रात्यक्षिकाने उपस्थितांच्या ह्रद्याचा ठोका चुकवला. उपस्थित पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन वाळकीचे केंद्र प्रमुख जालिंदर खाकाळ व वाळूंज हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब रोहोकले यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सबाजीराव गायकवाड, संस्थेच्या विश्वस्त छायाताई गायकवाड, पब्लिक स्कूल वाळुंजच्या प्राचार्या सोनलताई गायकवाड, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका प्राचार्य रूथ नायडू, पोखरी सेवा सोसायटीचे चेअरमन निजाम पटेल, ज्ञानतिर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या कोहिनकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी ढोलच्या निनादात लेझीम पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात प्राचार्या सोनल गायकवाड यांनी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुढच्या पिढीत संस्कार कुटुंबातून घडत असते. तर मुलांना देखील कुटुंब व नात्याचे महत्त्व समजण्यासाठी कुटुंब व नाते हा विषय घेऊन स्नेहसंमेलन घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळेचा वार्षिक अहवाल सादर करुन, वाढता गुणवत्तेचा आलेख मांडला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. 2023-24 या शैक्षणिक वर्षाचा उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार वंदना बोरुडे व उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार इयत्ता 10 वी ची विदयार्थीनी प्रतिक्षा भवर यांना देण्यात आला.

भाऊसाहेब रोहोकले म्हणाले की, ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देऊन वाळुंज पब्लिक स्कूल सर्वसामान्य शेतकरी वर्गातील मुलांना गुणवत्तेच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. मुले शिक्षणाने भरारी घेऊन पालकांच्या अपेक्षा पूर्ण करत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जालिंदर खाकाळ यांनी ग्रामीण भागात शिक्षण संस्था चालवणे कठीण काम आहे. मात्र गुणवत्तेने हा शिक्षणाचा वटवृक्ष बहरला आहे. सामाजिक बांधिलकी व तळमळीने वाळुंज पब्लिक स्कूलचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुटुंबातील नात्यांचा गोडवा दर्शविणारे विविध हिंदी-मराठी गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. ओ मॉ प्यारी मॉ…, तेरा मुझसे पहेले का नाता कोई…., तेरी उंगली पकड के चला…. या गीतांनी आई-वडिलांचे प्रेम दर्शविण्यात आले. दादा जी की छडी हु मैं…., सुन जोमात सासू कोमात आदी गीतांनी विविध नात्याची भावविश्व उलगडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश झरेकर आणि गणेश खुडे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती बेरड व स्मिता क्षीरसागर यांनी केले. आभार नामदेव लिंबोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.