विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, गणवेश आणि शूज वाटप
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारी मुलेही उज्वल भविष्य घडवितात -अभिजीत औटी
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच उन्हाळी सुट्टी संपवून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळा गजबली होती. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली.
औटी कुटुंबीयांतर्फे अभिजीत औटी यांच्या पुढाकाराने गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले.
यासोबतच शासनाच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व शूजचेही वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. तसेच नवोदित विद्यार्थ्यांच्या पावलाचे ठसे घेऊन शाळेचे पहिले पाऊल! उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका पद्मा मांडगे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, गेल्या काही वर्षांत शाळेचा शैक्षणिक तसेच भौतिक विकास झाला असून विद्यार्थी संख्या व गुणवत्ता दोन्ही वाढीस लागल्या आहेत. पालक, ग्रामस्थ व शिक्षक यांच्या एकत्रित सहभागातून शाळा गुणवत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमासाठी वंदना औटी, अभिजीत औटी, अध्यक्ष नानासाहेब होळकर, माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, रामदास फुले, लहू फुले, आकांक्षा भुजबळ, सोनाली कदम, मुख्याध्यापिका पद्मा मांडगे, सुरेश कार्ले, आशा ढोले, नूतन पाटोळे, मिना नायगावकर, अश्विनी औटी, शोभा औटी, नानासाहेब होळकर, सुभाष नेमाने, अमोल चौगुले, दत्तू कांडेकर आदींसह शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
अभिजीत औटी म्हणाले की, नेप्ती ही आमची जन्मभूमी आहे आणि येथेच आमचे बालपण गेले. आजही आम्ही आमच्या मातीशी नाते टिकवून आहोत. या शाळेत शिकणारी मुले ही आपल्या गावातील मुले आहेत, त्यांना कोणतीही अडचण भासू नये, या उद्देशाने हा छोटासा प्रयत्न करण्यात आला. शिक्षण हीच खरी शक्ती आहे. ज्या समाजात शिक्षण पोहचतं, तो समाज समृद्ध आणि सशक्त होतो. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारी मुलेही उज्वल भविष्य घडवू शकतात, हे अनेक विद्यार्थ्यांनी सिद्ध केले असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रमुख पाहुण्यांनी शिक्षणाबाबत प्रेरणादायी संदेश दिला.