मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द होण्यासाठी आंदोलनाचा दुसरा दिवस
वडाच्या झाडाखाली वर्ग भरवून दिला कर्मवीरांच्या आठवणींना उजाळा
नगर (प्रतिनिधी)- लक्ष्मीभाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह पालकांचे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालयात दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.2 जुलै) देखील आंदोलन सुरु होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, यासाठी संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालयाच्या आवारातच वर्ग भरविण्यात आले. वडाच्या झाडाखाली भरलेले वर्ग पाहून उपस्थितांना कर्मवीर भाऊरावांच्या आठवणींना उजाळा दिला.

कापड बाजार येथील लक्ष्मीभाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांना नुकतीच शाळा सुरु होऊन काही दिवस उलटले असताना त्यांचा अचानक बदलीचा आदेश प्राप्त झाला. आपल्या लाडक्या मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी पालक संघ समितीच्या माध्यमातून बुरुडगाव रोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलेले आहे. विद्यार्थी व पालकांनी शाळेवर देखील बहिष्कार टाकल्याने शाळा विद्यार्थ्यांशिवाय भरत आहे. वर्गात एकही विद्यार्थी हजर नसल्याने सर्व वर्ग रिकामे पडले आहे.
आंदोलन स्थळी एकीकडे विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्यात आलेले आहेत. तर एका बाजुला पालकांचा देखील ठिय्या सुरु आहे. मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द न झाल्यास, यापुढे आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.