विधाते विद्यालयाचा उपक्रम
जय ज्योती, जय क्रांतीच्या घोषाने परिसर दुमदुमले
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कै. दामोधर विधाते विद्यालयाच्या वतीने सारसनगर येथे अभिवादन रॅली काढण्यात आली. बॅण्ड पथकाच्या निनादात निघालेल्या रॅलीत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थीने सर्वांचे लक्ष वेधले. जय ज्योती, जय क्रांतीच्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमले. या रॅलीच्या माध्यमातून मुलगी वाचवा…मुलगी शिकवाचा संदेश देत स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला.

विधाते विद्यालयात संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन रॅलीचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष सुसे, शिक्षिका लता म्हस्के, निता जावळे, मिनाक्षी घोलप, प्रियंका साळवे, सारिका गायकवाड, शिक्षक राधाकिसन क्षीरसागर, योगेश दरवडे, भाऊसाहेब पुंड, अमोल मेहत्रे, सचिन बर्डे उपस्थित होते.
प्रा. शिवाजी विधाते म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे केल्याने महिला विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. विविध उच्च पदावर महिला विराजमान असून, याचे श्रेय त्यांना जाते. मुलींनी उच्च शिक्षण घेवून परिस्थितीपुढे न डगमगता आपले ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले.

शाळेत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषणे सादर केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.