चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव
दिव्यांगांचे शिक्षण व साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल भाऊसाहेब लक्ष्मण कदम यांना राज्यस्तरीय दिव्यांग मित्र पुरस्कार, तर साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मनाभ प्रभाकर हिंगे यांना साहित्य गौरव पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला आहे.
स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रविवार, 12 जानेवारी रोजी निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात कदम व हिंगे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक तसेच डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.
भाऊसाहेब लक्ष्मण कदम हे टिळक रोड येथील ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटीच्या कार्यशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आत्मनिर्भर बनविले आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना जीवनात सक्षमपणे उभे करण्याचे कार्य त्यांनी केले असून, त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय दिव्यांग मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, साहित्यिक पद्मनाभ प्रभाकर हिंगे यांनी लिहिलेला ‘शाल्मली’ हा ललित काव्यग्रंथ सामाजिक भान, सौंदर्यशास्त्र आणि मानवी जीवनाच्या मूलभूत मूल्यांचा वेध घेणारा आहे. या काव्यग्रंथातून मानवी जीवनाचे मर्म प्रभावीपणे मांडण्यात आले असून, त्यांच्या लेखनातून साहित्यिक प्रगल्भता स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत त्यांना साहित्य गौरव पुरस्कार 2026 प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीच्या वतीने दोन्ही पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली असून, पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
