पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम
संविधानाच्या कर्तव्यासह पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती
नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या पर्वावर पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने मूलभूत कर्तव्यांमधून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीला प्रारंभ करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन पर्यावरण संकटावर मात करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.
संविधानातील मूल्यांची जपणूक व मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करत मानवी शोषण नष्ट करणे व पर्यावरण संकटावर मात करणे हे या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे. याप्रसंगी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, वीर बहादूर प्रजापती, आनंदा आढाव, अमित थोरात, प्रमिला गायकवाड, संदीप पवार, पोपट भोसले, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, बबलू खोसला, रईस शेख, सचिन मुदळ, शब्बीर शेख आदी उपस्थित होते.
भारताच्या संविधानात कलम 51अ अंतर्गत दिलेली कर्तव्ये केवळ वैधानिक बाबी नाहीत, तर त्या राष्ट्रीय उन्नतीच्या दिशेने जाणारे मार्गदर्शक आहेत. वाढते जागतिक तापमान, पाणीटंचाई, पर्यावरणाचा ऱ्हास या गोष्टींवर जबाबदारीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर अनेक क्षेत्रांत प्रगती झाली असली, तरी पर्यावरणाचा ऱ्हास, सामाजिक असमतोल व नागरिकांच्या कर्तव्यांची उपेक्षा ही मोठी आव्हाने समाजासमोर असल्याची भावना अशोक सब्बन यांनी व्यक्त करुन या चळवळीत सर्वांच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.
रेन गेन बॅटरी या नवकल्पनात्मक तंत्रज्ञानाचा स्विकार होण्याची गरज आहे. पावसाचे संचित राखून शेतीसाठी, जैवविविधतेसाठी आणि मानवतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. तसेच धनराईद्वारे (ड्रायलँड हॉर्टिकल्चर) कोरडवाहू शेतीतून नफा आणि शाश्वत विकास साधणे शक्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
ही चळवळ जागतिक ज्ञान, सामाजिक समतेचा विचार आणि पर्यावरण संरक्षणाची तातडी यांचे त्रिसूत्रीवर आधारित आहे. सर्व नागरिकांनी संविधानाने दिलेल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून, भावी पिढ्यांसाठी पर्यावरण रक्षण आणि शोषणविरहित समाजनिर्मितीच्या दिशेने पावले उचलावीत असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.