• Fri. Sep 19th, 2025

कोल्हार येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Jun 26, 2025

पार्वतीबाई वेताळ सामाजिक विकास संस्थेचे 243 वे शिबिर; ग्रामीण भागात 27 वर्षांची अविरत सेवा

शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम दिशादर्शक – प्रा. भगवान काटे

नगर (प्रतिनिधी)- पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने कोल्हार (ता. पाथर्डी) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल 195 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यातील 24 रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.


संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले जात असून, हे 243 वे शिबिर होते. शिबिराचे उद्घाटन प्रा. भगवान काटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच गोरख पालवे मेजर होते. या प्रसंगी महादेव पालवे गुरूजी, ईश्‍वर पालवे, आजिनाथ पालवे, आनंदा गायकवाड, बबन पालवे, सुभाष पालवे, सोपान नेटके, आबांदास पालवे, जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, संस्थेचे अध्यक्ष मेजर शिवाजी वेताळ, आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रा. भगवान काटे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन सुरु असलेले उपक्रम दिशादर्शक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य समस्या गंभीर असून, यासाठी अशा शिबिरांची नितांत गरज आहे. पार्वतीबाई वेताळ सामाजिक विकास संस्था गेली 27 वर्षे जे कार्य करत आहे, ते अत्यंत प्रेरणादायी आहे. मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया यामुळे अनेक गरजूंच्या आयुष्यात प्रकाश निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.


मेजर शिवाजी वेताळ म्हणाले की, मागील 27 वर्षापासून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहचविण्याचे कार्य केले जात आहे. शेतकरी वर्गाला आरोग्याच्या दृष्टीकोनातून आधार देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मिरी येथे 4 वर्षापासून गो शाळा चालवली जात असून, गो रक्षण सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिबिरासाठी के. के. आय. बुधराणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. सौ. कोरडे यांनी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *