जिल्ह्यातील 128 विशेष शिक्षकांना तीन महिन्यांपासून वेतन नाही
उमेश शिंदे यांनी मांडली विशेष शिक्षकांची व्यथा; शिक्षण मंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 128 विशेष शिक्षकांना गेले तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही, आणि त्यामुळे सदर शिक्षकांच्या कुटुंबांची दिवाळी अंधारात गेली आहे. शिक्षकांच्या या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विशेष शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते उमेश शिंदे यांनी थेट शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या प्रश्नावर लक्ष वेधले.
यावेळी शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील विशेष शिक्षकांची व्यथा, त्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी, तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती शिक्षण मंत्री भुसे यांना दिली. या चर्चेदरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी परिस्थिती गांभीर्याने दखल घेत तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. मंत्री भुसे म्हणाले की, शासकीय नोकरी ही राष्ट्रसेवेची संधी आहे. शिक्षक हे समाजाच्या घडणीतील सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या हक्काच्या वेतनात विलंब होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. जबाबदार अधिकाऱ्यांनी तातडीने नियोजन करून शिक्षकांना न्याय द्यावा. त्यांनी शिक्षण सचिवांना त्वरित निर्देश देऊन पुढील कारवाईचे आदेश दिले, तसेच शिक्षकांना प्रोत्साहन व प्रेरणा देणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.
उमेश शिंदे यांनी यावेळी सांगितले की, राज्यात सध्या 2,984 विशेष शिक्षक अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. हे शिक्षक कोणतीही अपेक्षा न ठेवता दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक गुणवान विद्यार्थी घडले, परंतु दुर्दैवाने अद्यापपर्यंत त्यांना ना कौतुकाची थाप मिळाली, ना कोणताही सन्मान मिळाल्याचे स्पष्ट केले. तर शिक्षण मंत्र्यांना 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर हेलन केलर आणि लुईस ब्रेल पुरस्कारांच्या नावाने विशेष शिक्षक व उत्कृष्ट दिव्यांग विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा प्रस्ताव सादर केला. या मागणीवर मंत्री भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण सचिवांना पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. या भेटीवेळी सामाजिक कार्यकर्ते पिंटू बापू अहिरे, अमोल पाटील, विकी बडगे, सुनील अहिरे, राहुल पाटील यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने वेतनविलंबाचा निषेध नोंदवला आणि शिक्षकांच्या हक्कासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
