• Sat. Jul 19th, 2025

श्रमिकनगरच्या श्री मार्कंडेय विद्यालयाचे स्नेहसंमेलन रामायणाने रंगले

ByMirror

Jan 29, 2024

स्त्री शक्तीचा जागर करुन पारंपारिक लोकगीत सादर

आयुष्यात नेतृत्व करण्याचे बळ शिक्षणातून निर्माण होते -अनिल बोरुडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्या श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी भक्तीगीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर केला. तर प्रभू श्रीराम यांचा जन्मापासून ते रावण वध पर्यंत रामायणातील प्रसंग जीवंत केला. भक्तीमय वातावरणात सादर करण्यात आलेली गीतमय नाटिकामधून संपूर्ण वातावरण राममय बनले होते. उपस्थित प्रेक्षक व पालकांनी जय श्रीराम…, सिया रामचंद्र की जय..चा एकच गजर केला. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर सादर केलेल्या गीतांमधून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता. पारंपारिक लोकगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. तर टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देण्यात आली.


माजी उपमहापौर अनिल बोरुडे व स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण सिद्दम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष जयंत रंगा, संस्थेच्या सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ, विश्‍वस्त राजेंद्र म्याना, भीमराज कोडम, बत्तीन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, श्रमिक जनता हाऊसिंग सोसायटीचे विश्‍वस्त किसनराव बोम्मादंडी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, माध्यमिकचे मुख्याध्यापक शशीकांत गोरे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी ढोल व लेझीम पथकासह फुलांचा वर्षाव करुन पाहुण्यांचे स्वागत केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या गणित-विज्ञान, रांगोळी, चित्रकला व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका विद्या दगडे यांनी श्रमिक कष्टकऱ्यांच्या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक शशीकांत गोरे व मिनाक्षी बिंगेवार यांनी करुन दिला.
अहवाल वाचनात डॉ. रत्नाताई बल्लाळ यांनी सर्व सामान्य कामगारांच्या मुलांनी कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा आलेख मांडला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भारतीय अवकाश मोहिम या हस्तलिखीताचे विमोचन करण्यात आले. कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.


गणेश कवडे म्हणाले की, प्राथमिक शाळेतूनच जीवनाची खरी पायाभरणी होते. शिक्षणाने आयुष्यात मान-सन्मान मिळाला. मार्कंडेय शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून ताठ मानेने उभे आहे. मुलांच्या हातात मोबाईल आल्याने बौद्धिक विकास झाला, मात्र शारीरिक विकास खुंटला आहे. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळण्याची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर कर्तुत्व अंगी असल्यास जीवनात यशस्वी होता येते. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगळे कौशल्य व गुण असून, हे कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे पालक व शिक्षकांना आवाहन केले.


अनिल बोरुडे म्हणाले की, शालेय जीवनाचे दिवस पुन्हा येत नाही. शाळेत तळमळीने शिकवले जाते व संस्कार घडविले जाते. जीवनात पुढे जाण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. आयुष्यात नेतृत्व करण्याचे बळ शिक्षणातून निर्माण होते. शिक्षकांनी दिलेल्या संस्कारातून समाजात काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. बाळकृष्ण सिद्दम यांनी मुलांचे कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे हे प्रत्येक शिक्षक व पालकाचे कर्तव्य आहे. मुलांना पुस्तकी शिक्षणाबरोबर जीवनाचे पुस्तक शिकवण्याचे त्यांनी आवाहन केले.


यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून विद्या एक्कलदेवी, रेखा सग्गम आदींसह पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता भावसार, सुजाता सिद्दम, जयश्री चिंतल, भारती गाडेकर, सुचेता म्याना यांनी केले. आभार वैशाली वरुडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *