वक्तृत्व स्पर्धा, रॅली व पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम आयोजन
विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित श्री शाहू विद्यामंदिर, खडांबे (ता. राहुरी) येथे राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिक्षणप्रेमी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारे समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर शाळेत वक्तृत्व स्पर्धा रंगली होती. तसेच शाळेत पारंपारिक वाद्यासह रॅली काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी शाळेच्या आवारात असलेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य मकरंद रायते, पर्यवेक्षक आप्पासाहेब शिंदे, कृषी भूषण सूरसिंगराव पवार, भानुदास कलापुरे, भाऊसाहेब आवारे, प्रभाकर हरिश्चंद्र यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात शालेय परिसरातून रॅली काढली. रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी शिक्षक संजय रोकडे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना केशर आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यात आली.
शाळेचे प्राचार्य मकरंद रायते यांनी राजर्षी शाहू महाराज हे आधुनिक भारतातील सामाजिक न्यायाचे प्रणेते होते. त्यांच्या विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे, ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य, त्यांची शिक्षणातील भुमिका, आजच्या युगातील शाहू महाराजांच्या विचारांचे महत्त्व यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणं दिली. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.