शाहू महाराज म्हणजे सर्वांगसंपन्न राष्ट्रपुरुष -क्रीडाधिकारी अजय पवार
नगर (प्रतिनिधी)- मागास समाजाला आरक्षण देणारा पहिला राजा, मुलांना शिक्षण मिळावे म्हणून जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपये दंड ठोटावणारा; कला, क्रीडा व शिक्षण यांना राजाश्रय तसेच अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करून समाजाची घडण करणारा सर्वांगसंपन्न राष्ट्रपुरुष म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी अजय पवार यांनी केले.
नगर तालुक्यातील राळेगण येथील श्रीराम विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांची 151 वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते. विद्यालयाने क्रीडा क्षेत्रात आतंरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतल्याने शाळेचे व संस्थेच्या नावलौकीकात भर घातल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर चपळगावकर यांनी शाळेचे अभिनंदन केले. तर शाहू महाराजांच्या दुरदृष्टीपणामुळे व केलेल्या सुधारणांमुळे समाजात प्रगती व समानता दिसत आहे. शाळेचा 18 वर्षे शंभर टक्के निकाल, शासनाचे फाइव्ह स्टार मानांकन, मुख्यमंत्री स्वच्छ – सुंदर शाळेत सलग दोन वर्षे मिळविलेले बक्षीस, स्कॉलरशीप पात्र विद्यार्थी यामुळे शाळा सर्वगुणसंपन्न बनल्याचे या वेळी चपळगावकर म्हणाले.
यावेळी डॉ.ना.ज पाऊलबुधे विद्यालयाचे मा. प्राचार्य भरत बिडवे यांनी अध्यापनासाठी सर्व वर्गात वापरत असलेल्या इंटरॅक्टीव्ह बोर्ड तसेच डिजीटल अध्यापन पद्धती तसेच शाळेच्या गुणवत्तेबाबत मुख्याध्यापक व स्टाफचे कौतुक केले. वसतिगृहाच्या माध्यमातून सर्वसामान्य मागास कुटुंबातील विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने न्याय देण्याचे काम म्हणजेच शाहूंना खरी आदरांजली आहे, असे मत मेहकरी विद्यालयाचे मा. प्राचार्य विकास गोबरे यांनी मांडले. प्राचार्य अण्णासाहेब लोंढे, मुख्याध्यापक विजय जाधव, राजेंद्र कोतकर, संजय भापकर, हरीभाऊ दरेकर यांची यावेळी भाषणे झाली.
मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल विजय जाधव यांचा मान्यवरांनी सत्कार केला. विद्यालयाच्या वतीने पाहुण्यांना शाहूंचा चरित्र ग्रंथ भेट देण्यात आला. उत्कृष्ट भाषणा बद्दल इयत्ता 5 वी मधील अनुजा खोटे हिचा रोख बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शाहू महाराजांच्या कार्याची महती व जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. कैलास गुंड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. नीळकंठ मुळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास अजय पवार, सुधीर चपळगावकर, भरत बिडवे, अण्णासाहेब लोंढे, विकास गोबरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय जाधव, शिक्षक राजश्री जाधव, राजेंद्र कोतकर, हरीभाऊ दरेकर कैलास गुंड, संजय भापकर, नीळकंठ मुळे, सुजय झेंडे, आकाश मनवरे, विशाल मुळे, विशाल शेलार, रामदास साबळे, आकांक्षा शेलार आदी उपस्थित होते.