• Wed. Oct 29th, 2025

सेवाप्रीत कडून उत्कर्ष बालभवनच्या विद्यार्थ्यांसाठी साऊंड सिस्टम भेट

ByMirror

Oct 28, 2025

दिवाळीनिमित्त फराळ, चॉकलेट व शैक्षणिक साहित्याचे वाटप;


महिलांनी बालभवनच्या मुलांसोबत लुटला दिवाळीचा आनंद

अहिल्यानगर (प्रतिनिधी)-समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनच्या विद्यार्थ्यांना साऊंड सिस्टमची भेट देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फराळ, चॉकलेट व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनच्या महिला सदस्यांनी मुलांसोबत आतिषबाजीचा आनंद लुटत खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.


मंगलगेट येथे प्रकल्प प्रमुख डॉ. सिमरन वधवा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी दीपीका चोईथरमानी, गगन वधवा सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, दिप्ती सबलोक, शेरी धुप्पड, मिनी खत्री, जया मेघनानी, टिना कुमार, गगन बग्गा, रवी नारंग, विमी मक्कर, शिल्पा छाबरा आदींसह फाउंडेशनच्या महिला सदस्या आणि उत्कर्ष बालभवनच्या शिक्षिका उपस्थित होत्या.


जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, उत्कर्ष बालभवनमध्ये समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मुलांना दर्जेदार शिक्षण व आवश्‍यक सुविधा मिळाव्यात म्हणून सेवाप्रीत सातत्याने योगदान देत आहे. शिक्षण हेच खरे साधन आहे जे या मुलांचे भविष्य उज्ज्वल करू शकते. आम्ही जेव्हा या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहतो, तेव्हा आमच्या सर्व परिश्रमांचे सार्थक झाल्याची भावना निर्माण होते. चांगले विद्यार्थी घडले, तर निश्‍चितच सक्षम भारत घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. सिमरन वधवा म्हणाल्या की, या मुलांबरोबर दिवाळी साजरी करण्याचा अनुभव अनमोल आहे. सेवाप्रीत फाउंडेशनच्या वतीने त्यांना शिक्षणासाठी आवश्‍यक साधनसामग्री, प्रोत्साहन आणि प्रेम दिल्याने मुलांचा आत्मविश्‍वास वाढणार आहे. त्यांच्या डोळ्यांतील आनंद पाहून वाटतं, हीच खरी दिवाळी, प्रकाशाची नव्हे तर मनांच्या आनंदाची दिवाळी साजरी केल्याचे समाधान मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनला सेवाप्रीत फाउंडेशनने यापूर्वी देखील विविध प्रकारे मदत केली आहे. या वेळेस विद्यार्थ्यांसाठी साऊंड सिस्टम भेट देऊन त्यांना शैक्षणिक सादरीकरणे, कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये अधिक चांगली संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना मिळालेला फराळ व विविध वस्तूंने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नेहमीच पाठबळ देत असल्याबद्दल उत्कर्ष बालभवनच्या वतीने सेवाप्रीतचे आभार मानण्यात आले. या उपक्रमास शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *