शैक्षणिक व खेळण्याच्या साहित्याने भरलेली मडकी फोडून विद्यार्थ्यांची धमाल
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह लहान मुलांच्या खेळण्यांचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवाप्रीतच्या महिला सदस्यांनी वस्तीगृहात जाऊन वंचित घटकातील विद्यार्थ्यांसह श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा आनंद बाळगोपालांसह युवक लुटत असतात. हा आनंद वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा विद्यार्थी वस्तीगृहात (महात्मा फुले छात्रालय) हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख अन्नू थापर, अर्चना खंडेलवाल, डॉ. सिमरन वधवा, अनिता मंत्री, नीलिमा शाह, पूजा बजाज, पल्लवी रेणावीकर उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व खेळण्याच्या साहित्याने भरलेली मडकी फोडून एकच धमाल केली. यावेळी सेवाप्रीतच्या वतीने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह लहान मुलांच्या खेळण्यांचे वाटप करण्यात आले. मडकी खांबावर टांगून विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून मडकी फोडण्याचा कार्यक्रम रंगला होता. तर विविध गीतांवर महिला सदस्यांसह विद्यार्थ्यांनी ठेका धरला होता. मडकी फोडणाऱ्या विद्यार्थ्याला सेवाप्रीतच्या वतीने बक्षीस देण्यात आले. मुलांचा उत्तम प्रकारे देखभाल करणारे वस्तीगृहाचे सचिव गणेश कोरडे यांचा महिलांनी सन्मान केला.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, श्रीकृष्ण जन्माष्टमीत सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी सेवाप्रीतने हा उपक्रम राबविला आहे. वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सण-उत्सवाचा आनंद घेता येत नाही. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याच्या उद्देशाने व शिक्षणासाठी देखील प्रोत्साहनपर हा उपक्रम राबविल्याचे सांगितले. अन्नू थापर यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा वस्तीगृहात साजरा झालेला हा सोहळा विस्मरणीय आहे. वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून सणाचा गोडवा द्विगुणीत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पायल जग्गी, रिया छाब्रिया, रितू अग्रवाल, सविता बोरा, मनीषा थापर, कविता खंडेलवाल, नेहा भगवानी, नितू आहुजा, अर्चना खंडेलवाल, विनिता छाब्रिया, चंदा खंडेलवाल, लता खंडेलवाल, कृतिका बजाज, रवनीक धुप्पड आदी महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.