• Wed. Dec 31st, 2025

सप्तरंग महोत्सवात जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम सप्तरंग नाट्यगौरव पुरस्काराने सन्मानित..

ByMirror

Oct 15, 2024

नाट्य क्षेत्रातील कलावंतांचा सन्मान

नाटक माणसाला जीवनाकडे चिकित्सक वृत्तीने व डोळे उघडून बघायला नाटक शिकवते – अरूण कदम

नगर (प्रतिनिधी)- देशातील चांगले व प्रगतीला पोषक वातावरण कालांतराने बदलून आत्मकेंद्रीत बनले आहे. चिकित्सक वृत्तीने व डोळे उघडून बघण्याचे नाटक शिकवते. शेजारच्या व्यक्तीकडे माणूस म्हणून बघायला सुरुवात करायला पाहिजे. नाटक दृष्टिकोन व्यापक करायला शिकवते. जीवनात माणूस महत्त्वाचा असून, मनुष्याचे जीवन सुखद करणे हे कलावंतांचे प्रथम कर्तव्य आहे. नाटकातून माणूस म्हणून प्रत्येकाला घडविता आल्यास देश पुन्हा सुजलाम सुफलाम होणार असल्याची भावना मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांनी व्यक्त केली.


सप्तरंग थिएटर्सने आयोजित केलेल्या सप्तरंग महोत्सवात मागील 35 वर्षांपासून महाराष्ट्राच्या हौशी रंगभूमीवर लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि तंत्रज्ञ या क्षेत्रात कार्यरत असलेले कदम यांना सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रा.डॉ. रत्ना वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास एकसंबेकर, अभिनेत्री दया एकसंबेकर, स्वागताध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, सप्तरंग थिएटर्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्‍याम शिंदे उपस्थित होते.


पुढे बोलताना कदम म्हणाले की, नाटक जीवनात ऊर्जा देतो. नाटक मनोरंजनापुरते मर्यादित नसून, माणूस म्हणून संपन्न करायला नाटक मदत करते. माणूस म्हणून नम्रतेची भावना नाटकातून निर्माण होते व वैयक्तिक विकासही साधला जातो. सप्तरंग थिएटर्सची 38 वर्षांची रंगभूमीवरची वाटचाल थक्क करणारी आहे. सर्वच क्षेत्रातील लोक एकत्र येऊन ही चळवळ पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.


प्रारंभी नटराजपूजनाने कार्यक्रमाचे सुरुवात झाली. श्रीया परदेशी हिने बहारदार नटराजनृत्याचे सादरीकरण केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचा लेखाजोखा व 38 वर्षांच्या वाटचालीची माहिती देणाऱ्या सप्तरंग स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सप्तरंगचे ज्येष्ठ कलावंत दिपक ओहोळ व उद्योन्मुख कलावंत कल्पेश शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.


प्रास्ताविकात श्‍याम शिंदे म्हणाले की, नाटकांमध्ये सतत व्यस्त असताना दोन वर्षातून केलेल्या कामाचा आढावा व भविष्यातील वाटचाल ठरविण्यासाठी मागील सहा वर्षापासून सप्तरंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. तर रंगभूमीवरती दीर्घकाळापासून उत्तम कार्य करणाऱ्या रंगकर्मींना पुरस्काराने सन्मानित केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सप्तरंग थिएटर्स 38 वर्षापासून कार्यरत असताना राज्य नाट्य स्पर्धेत 175 पेक्षा जास्त पारितोषिके पटकाविली. सिनेमा, सिरीयल व व्यावसायिक नाटकामध्ये सप्तरंगचे 20 पेक्षा अधिक कलाकार कार्यरत असल्याची व संस्थेच्या वाटचालीची त्यांनी माहिती देऊन पाहुण्यांचा परिचय करुन दिला.


ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, सामाजिक बदलाची भूमिका म्हणून नाटकाचे कार्य राहिले आहे. पूर्वी ऐतिहासिक नाटक असायचे, स्वातंत्र्य चळवळीत त्याला सामाजिक विषय प्राप्त झाले. नाटकाने समाज जागृतीद्वारे स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्याचे काम केले. महाराष्ट्रासह जिल्ह्यातील नाट्यभूमी देशात सकस असून, त्याला मोठा इतिहास आहे. अनेक दिग्गज कलाकार या मातीतून घडले. ही नाट्य चळवळ पुढे घेऊन जाण्याचे कार्य सप्तरंग थिएटर्स करत असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी नाटकाचा इतिहास थोडक्यात सांगितला.


श्रीनिवास एकसंबेकर म्हणाले की, नाटकाच्या संहितेच्या देवाण घेवाणीतून सप्तरंग या संस्थेशी ऋणानुबंध जोडले गेले. लेखकाला त्याच्या नाटकाची संहिता एका मुलीप्रमाणे असते. त्याला आलेले स्थळ योग्य आहे की नाही? याची चौकशी करुन ती संहिता दिली जाते. याबाबत अश्‍वदा ची संहिता सप्तरंग थिएटर्सला देऊन योग्य ठिकाणी गेल्याचे समाधान मिळाले. सोशल मीडियाच्या अतिक्रमणात नाटकाचे पूरक अंग नव्या कलाकारांमध्ये लुप्त होत आहे. मात्र ही संस्था नाट्य क्षेत्राची नाळ तुटू न देता रंगभूमीचा वारसा जपण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेत्री दया एकसंबेकर यांनी 38 वर्षापूर्वी लावलेला सप्तरंग थिएटर्सचा वटवृक्ष बहरला आहे. शेकडो कलाकार घडले असून, नाट्य चळवळ बहरली असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. रत्ना वाघमारे म्हणाल्या की, मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचे व जीवनाला समाधान देण्याचे काम कला करीत असते. नाट्यकला सोशल मीडियाच्या युगातही आपले अस्तित्व टिकवून दिमाखदार वाटचाल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमात पुरुषोत्तम करंडक पटकाविणारे न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील नाट्य कलाकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच नाट्य, कला व साहित्य क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सप्तरंगचे कार्यकारिणी सदस्य डॉ. संतोष पोटे, वसंतलाल बोरा, सत्यवान गागरे, दिपक तुपेरे, राजेंद्र चौधरी, वैशाली कोल्हे, अजयकुमार पवार, सागर अधापुरे, एन.बी. धुमाळ, हर्षल काकडे, प्रा. रावसाहेब भवाळ, डॉ. प्रकाश जाधव, आकांशा शिंदे आदींसह नाट्य क्षेत्रातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *