• Tue. Jul 1st, 2025

शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते मुख्याध्यापक हबीब शेख यांचा पुरस्काराने गौरव

ByMirror

Oct 7, 2024

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब चाँदभाई शेख यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने सावंतवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत शेख यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हबीब शेख अनेक वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्यातून भावी पिढी घडविण्याचे कार्य ते करत आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ते सातत्याने करत आहे. विद्यालयाचा तालुक्यात स्तर उंचावण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


या शिक्षण परिषदेमध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेख यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भानुदास कोतकर, संस्थेचे सचिव सचिन कोतकर, भाग्योदय विद्यालय केडगावचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड, जगदंबा विद्यालय केडगावचे मुख्याध्यापक जयसिंग दरेकर व विद्यालयातील शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *