• Sun. Jul 20th, 2025

भुतकरवाडी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

ByMirror

Jan 3, 2024

निरोगी आरोग्याचा कानमंत्र देऊन महिलांची आरोग्य तपासणी

आंबेडकर फाउंडेशन व समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- आंबेडकर फाउंडेशन व समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भुतकरवाडी येथील स्ट्रॉबेरी प्री स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण मार्गदर्शन आणि महिला व विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. महिलांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र देऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधले.


प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका वंदनाताई ताठे, सुरेख आडम, डॉ. योगिता सत्रे, समृद्धी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती डोमकावळे, विद्या राजहंस, धनश्री काळे, सविता सब्बन, अशोक हिंगे, डॉ. रणजीत सत्रे, गोविंदा आडम, प्रवीण मेढे, वैष्णवी मेढे,  दिगंबर भोसले, प्रकाश डोमकावळे आदींसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. योगिता सत्रे म्हणाल्या की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने महिलांना शिक्षणाचा हक्क मिळाला. त्यांनी खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाची बीजे रोवली. आजची स्त्री त्यांच्या त्यागाने व कार्याने सक्षम बनली आहे. महिलांनी आरोग्याकडे लक्ष देऊन व्यायामाने सशक्त होऊन समाजाला पुढे घेऊन जाण्याचे त्यांनी सांगितले.


स्वाती डोमकावळे म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्री शिक्षणाची चळवळ चालवून त्यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुले केले. आज महिला सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे याचे सर्व श्रेय फुले दांम्पत्यांना जाते. त्यांच्या विचाराने समाजाला दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या गिरीजा सब्बन या विद्यार्थिनीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन केले. यावेळी उपस्थित महिला व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना निरोगी आरोग्यासाठी व्यायाम व आहाराची माहिती देण्यात आली. तसेच महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमासाठी जय असोसिएशन ऑफ एनजीओचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *