रायझिंग युथ ॲण्ड ट्रायबल फाऊंडेशनचा उपक्रम
सावित्रीबाई यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून स्त्री-पुरुष समानता व सामाजिक समता प्रस्थापित केली -ॲड. प्रणाली चव्हाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- रायझिंग युथ ॲण्ड ट्रायबल फाऊंडेशनच्या वतीने स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिवस म्हणून साजरी करण्यात आली. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी निवृत्त सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता ॲड. प्रकाश बी. गायकवाड, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे खजिनदार ॲड. राजेश कावरे, माजी उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. महेश शिंदे, ॲड. ज्ञानेश्वर दाते, ॲड. अमोल डोंगरे, ॲड. सुजाता बोडखे,ॲड. लक्ष्मी छाया रामदिन, ॲड. अनिता दिघे, फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड. प्रणाली चव्हाण, ॲड. गौरी सामलेटी, ॲड. प्राजक्ता करांडे, संतोष कांडेकर, डॉ. संतोष गिऱ्हे, पोपट बनकर, आरती शिंदे, जयश्री शिंदे, निखिल चव्हाण, आनंद सूर्यवंशी आदींसह महिला वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ॲड. प्रणाली चव्हाण म्हणाल्या की, आजची स्त्री ही सक्षम असून, तिला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मशाल पेटवून समाजाचा उध्दार केला. आजच्या महिलांनी सुखी संसार करुन आपल्या कुटुंबाचा उध्दार करावा. सावित्रीबाई यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या मदतीने स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून स्त्री-पुरुष समानता व सामाजिक समता प्रस्थापित केली. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले या दांपत्यांचे विचार समाजाला दिशा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.