राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान; कवी संमेलनाचे भूषवले अध्यक्षपद
नगर (प्रतिनिधी)- मराठी मिशनच्या 213 व्या जयंतीनिमित्त साप्ताहिक उपदेशक आणि मराठी मिशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनात प्रसिद्ध कवयित्री, मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात सरोज आल्हाट यांना पहिल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनात पुरस्काराचा मान आणि कवी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान मिळाला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात मराठी मिशनच्या अध्यक्षा आणि संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉ. विजया जाधव यांच्या हस्ते आल्हाट यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष जॉर्ज क्षेत्रे, मराठी मिशनचे सचिव एस.के. अल्हाट, ज्येष्ठ पत्रकार कमिल पारखे, फादर जो. गायकवाड, पत्रकार भूषण देशमुख, ख्रिस्ती साहित्य परिषदेचे अध्यक्ष पावलस वाघमारे, उपदेशक संस्थापक विक्रम गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सरोज आल्हाट यांना यापूर्वीही राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यावेळी मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.