विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ विद्यालय, नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार, निळकंठ वाघमारे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तृप्ती वाघमारे, रमेश गाडगे, प्रमोद थिटे, भानुदास लंगोटे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, प्रतिभा डोंगरे, रिजवान शेख, वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, देशाचे स्वातंत्र्य व एकात्मतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान न विसरता येणार आहे. देशाचे गृहमंत्री असताना अनेक संस्थाने त्यांनी खालसा केली. अखंड भारतासाठी त्यांनी दिलेला विचार अंगीकारणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तम कांडेकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणांनी परिसर दणानून निघाला.

तसेच नेहरु युवा केंद्राच्या शहरातील कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करुन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी डोंगरे, रिजवान शेख, रमेश गाडगे उपस्थित होते. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, दिपाली बोडखे यांचे मार्गदर्शन लाभले.