जय हिंद फाउंडेशनच्या वतीने दुर्मिळ वृक्ष गोरख चिंच व राज्य पुष्प ताम्हण झाडांच्या रोपांची लागवड
आजच्या पिढीने देशप्रेम आणि पर्यावरणसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे -शिवाजी पालवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाची मोहिम चालविणाऱ्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने कोल्हार (ता. पाथर्डी) येथे सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती वृक्षारोपणाने साजरी करण्यात आली. दुर्मिळ वृक्ष असलेले गोरख चिंच व राज्य पुष्प असलेले ताम्हण झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
कोल्हार येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणाने अभिवादन करून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन फार्मा कंपनीचे सीएसआर हेड सोमनाथ दडस, निवृत्त मुख्याध्यापक महादेव पालवे गुरुजी, सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर पालवे, किशोर पालवे, शिवाजी पालवे, तसेच मुख्याध्यापक राजेंद्र दुसंगे उपस्थित होते. तसेच जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, धर्मनाथ पालवे, गोकुळ पालवे, संपत पालवे, अनुप पालवे, सिद्धार्थ पालवे, कार्तिक नेटके, कृषी अधिकारी मिनीनाथ बेल्हेकर आणि शालेय शिक्षक बजरंग बांदल, जयश्री भापकर, सुरेश कोळगे, सुजाता वाळूंज, वैशाली कदम यांची विशेष उपस्थिती होती.
शिवाजी पालवे म्हणाले की, भारत देशाला एकसंघ ठेवण्यासाठी आणि प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी सरदार वल्लभाई पटेल यांनी अपूर्व योगदान दिले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आजच्या पिढीने देशप्रेम आणि पर्यावरणसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. गोरख चिंच हे झाड औषधी गुणधर्मांनी समृद्ध व अतिशय दुर्मिळ आहे, तर ताम्हणचे झाड महाराष्ट्राचे राज्य पुष्प असून आपल्या सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांना या झाडांची माहिती मिळावी म्हणून जय हिंद फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये ताम्हण आणि गोरख चिंच वृक्ष लागवड मोहिमा राबवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमनाथ दडस यांनी जय हिंद फाउंडेशनच्या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, संघटनेने पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचे सुरू असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. उपसरपंच गोरक्ष पालवे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
