शालेय विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
सरदार पटेल यांनी संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताची बांधणी केली -पै. नाना डोफ्लगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती ग्रामपातळीवर विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले, तर नवनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन देशाच्या ऐक्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाचे आयोजन निमगाव वाघा ग्रामपंचायत, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, हॅपी हेल्दी कम्युनिटी, वैष्णवी ऑप्टीकल, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि नवनाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सौ. उज्वलता कापसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोफ्लगरे, ग्रामसेवक प्रविण पानसंबळ, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, अतुल फलके, केशव जगदाळे, रविंद्र काळोखे, डॉ. आकाश जरबंडी, डॉ. ओमकेश कोफ्लडा, मंदा साळवे, तेजस केदारी, प्रमोद थिटे, तृप्ती वाघमारे, दिपाली ठाणगे, तुकाराम पवार, स्वाती इथापे, निकिता रासकर, आप्पा कदम, प्रशांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांनी शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी विविध रोगांची तपासणी करण्यात आली तसेच नागरिकांना संतुलित आहार, व्यायाम व निरोगी जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन देण्यात आले. डोळ्यांची तपासणी करून गरजू रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय टीमने दिली.
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. मंदा साळवे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणांनी परिसर दणानून टाकला.
पै. नाना डोफ्लगरे म्हणाले की, देशाचे स्वातंत्र्य आणि एकात्मता टिकविण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी गृहमंत्री म्हणून अनेक संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताची बांधणी केली. त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक एकतेचा, राष्ट्रभक्तीचा आणि निरोगी समाजनिर्मितीचा संदेश देत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमास मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आणि रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
