दिवसा कष्ट, रात्री शिक्षण आणि परीक्षेत यशस्वी वाटचाल
कुटुंबाची जबाबदारी सांभाळत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश प्रेरणादायी -पांडुरंग गवळी
नगर (प्रतिनिधी)- शहरातील नव विद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी (एस.एस.सी.) बोर्डाच्या परीक्षेत उत्तम कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. दिवसा पूर्ण वेळ काम करून, रात्री शाळेत येऊन अपूर्ण शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यावर यश मिळवले आहे.
या यशानंतर शाळेच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग गवळी, वर्गशिक्षिका देवका लबडे, शिक्षक विलास शिंदे, विणा कुऱ्हाडे, महेंद्र म्हसे तसेच शिक्षकेतर कर्मचारी राजू भुजबळ आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक पांडुरंग गवळी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हणाले की, कुटुंबाची जबाबदारी सांभाळत शिक्षण घेणे हे फारच कठीण काम असते. मात्र या विद्यार्थ्यांनी दुहेरी कर्तव्य पार पाडत आपल्या मेहनतीचे फळ मिळवले आहे. हे यश इतरांसाठीही प्रेरणादायी आहे. दहावी ही आयुष्यातील महत्वाची पायरी असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हे विद्यार्थी सज्ज झाले असून, त्यांनी भविष्यातील योग्य दिशा ठरवून वाटचाल करण्याचे आवाहन केले.
सरस्वती मंदिर नाईट स्कूलचा यंदाचा दहावीचा निकाल 66.66 टक्के लागला आहे. या निकालामध्ये ज्योती मनोहर टिपरे हिने 61.80% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या पाठोपाठ ललिता दगडू कांबळे हिने 59.20% गुण मिळवून द्वितीय स्थान मिळवले तर मनीषा सूर्यभान कांबळे हिने 57% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
संस्थेचे पदाधिकारी डॉ. रवींद्र साताळकर, डॉ. निलेश वैकर, डॉ. अनिरुद्ध गीते, मंगेश धर्माधिकारी आदी विश्वस्तांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.