मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग व सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय खामकर यांना मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय संत रविदास महाराज पुरस्काराने गौरविण्यात आले.

नरिमन पॉइंट मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) जमशेदजी बाबा नाट्यगृहात झालेल्या या शासनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, सामाजिक न्याय विभागचे सचिव सुमन भांगे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोडिया, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये आदी उपस्थित होते.
संजय खामकर गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून चर्मकार समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून समाजाला प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य करताना समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला असून, शासनस्तरावर समाजाचे प्रश्न सुटण्यासाठी त्यांचे कार्य सुरु आहे.
राज्यातील लाखो समाजबांधवांना त्यांनी संघटित केले असून, गटई कामगारांच्या न्याय हक्कासाठी ते कार्य करत आहे. वधू-वर परिचय मेळावे व रोजगार मेळावा घेवून युवकांना दिशा देण्याचे कार्य ते करत आहे. शहरात संत रविदास महाराज विकास केंद्र उभारण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाच्या वतीने त्यांना संत रविदास महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल खामकर यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
सामाजिक न्याय विभाग व चर्मोद्योग महामंडळ समाज विकासाच्या विविध योजनांचा लाभ समाजाच्या तळागाळातील बांधवांना मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे चर्मकार समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक बैठक पार पडली. चर्मकार विकास संघाच्या मागणीला यश आले असून, देवनार (मुंबई) येथील दोन हजार एकर जागेत जागतिक दर्जाचे लेदर पार्कची घोषणा नुकत्याच अधिवेशात अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी करून समाजाला न्याय दिलेला आहे. -संजय खामकर (प्रदेशाध्यक्ष, चर्मकार विकास संघ)