पवार कुटुंबीयांचा पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम
‘आजचे रोप उद्याचा श्वास’ संकल्पनेतून मुलीच्या जन्माचा आनंद साजरा; मुलीच्या नावाने लावलेल्या रोपाचे संवर्धन करण्याचा निर्धार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजात मुलीच्या जन्माचे विविध प्रकारे स्वागत केले जाते. मात्र, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मुलीच्या जन्माचा आनंद वृक्षारोपणाद्वारे साजरा करण्याचा प्रेरणादायी उपक्रम शहरातील पवार कुटुंबीयांनी राबविला आहे. घरात कन्यारत्नाचे आगमन झाल्यानंतर तिच्या नावाने रोपाची लागवड करून त्याचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमातून मुलींचा सन्मान आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही मूल्यांचा सुंदर संगम घडवून आणण्यात आला.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महिला जिल्हाध्यक्ष लतिका पवार यांची नात तसेच इंजि. प्रसाद पवार व प्रांजल पवार या दाम्पत्यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले. कुटुंबात नव्या पाहुणीच्या आगमनाने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या आनंदाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत कुटुंबीयांनी वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम राबविला.
‘आजचे रोप उद्याचा श्वास’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमांतर्गत कन्येच्या नावाने रोप लावण्यात आले. केवळ वृक्षारोपण न करता त्या रोपाचे नियमित संगोपन, संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारीही कुटुंबीयांनी स्वीकारली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे झपाट्याने कमी होत असलेले हरित क्षेत्र, वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि तापमानवाढ या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
घरात लक्ष्मीच्या रूपाने आलेल्या कन्येचे स्वागत करताना वृक्षारोपण करण्यात आले. ज्या पद्धतीने मुलांचे संगोपन केले जाते, त्याच पद्धतीने या रोपाचेही संगोपन केले जाईल, अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली. मुलीचा जन्म आणि वृक्षारोपण यांचा संबंध जोडल्याने समाजात पर्यावरणाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी ब्रेन पॉवर सॉफ्टवेअरचे संचालक संतोष कदम, स्वाती कदम, प्रणव कदम, वीराज्ञी पवार, सम्राज्ञी पवार यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत प्रत्येक कुटुंबाने अशा प्रकारे वृक्षारोपणाचा संकल्प स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.
लतिका पवार म्हणाल्या की, मुलगी ही घराची शान, कुटुंबाचा अभिमान आणि समाजाच्या प्रगतीची दिशा असते. कन्यारत्नाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही आपण विसरता कामा नये. झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा, स्वच्छ वातावरण आणि हिरवाई लाभावी यासाठी प्रत्येक जन्म, वाढदिवस किंवा आनंदाचा क्षण वृक्षारोपणाशी जोडला गेला पाहिजे. आज लावलेले हे रोप उद्या मोठे वृक्ष बनून अनेकांना सावली, प्राणवायू आणि जीवन देईल. समाजातील प्रत्येक कुटुंबाने मुलीच्या जन्माचे स्वागत अशाच सकारात्मक उपक्रमांनी करण्याचे त्यांनी सांगितले.
इंजि. प्रसाद पवार म्हणाले की, आमच्या कन्येच्या जन्मामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता समाजाला संदेश देणारा असावा, या उद्देशाने आम्ही वृक्षारोपणाचा निर्णय घेतला. मुलगी आणि झाड या दोघांच्याही संगोपनासाठी प्रेम, काळजी आणि सातत्य आवश्यक असते. आज लावलेले हे रोप आमच्या मुलीसोबत वाढत राहील. तिच्या प्रत्येक वाढदिवशी या झाडाचीही वाढ पाहण्याचा आनंद आम्हाला मिळेल. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे त्यांनी आवाहन केले.
