जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका संगिता घोडके यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याबद्दल मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने आझाद मैदान येथील पत्रकार भवनात 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ (लखुजी जाधवराव) यांचे सोळावे वंशज श्रीमंत संभाजीराजे जाधव यांच्या हस्ते घोडके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यासाठी मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, उद्योजिका संगिताताई गुरव, मॉडेल स्मिता भोसले-धुमाळ, मुंबई महापालिकेचे माजी महापौर महादेव देवळे, सुभाष गायकवाड, तेजस्विनी गलांडे, स्वािगताध्यक्ष देवानंद कांबळे, महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव सुरज भोईर आदी उपस्थित होते.
संगिता घोडके कापूरवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित एम.एड कृती समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक कार्यात योगदान सुरु असून, शिक्षकांच्या प्रश्नावर देखील ते कार्य करत आहे. समाजातील गरजू विद्यार्थी व महिलांना ते नेहमीच आधार देण्याचा काम करत असतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले असून, ते आज उच्च पदावर कार्यरत आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.