33 वर्ष शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या श्रीमती संगीता किशोर जोशी यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात पार पडला. प्राचार्या जोशी यांनी 33 वर्ष शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने या ज्ञानसेवेचा मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
प्रशालेचे चेअरमन ॲड. किशोर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष दीपक ओहोळ, व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, खजिनदार संजय कुलकर्णी, सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, कार्यकारिणी सदस्य स्वप्निल कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, सुनील जोशी, ॲड. वेद देशपांडे, तसेच सांगळे गल्ली येथील मुख्याध्यापिका वसुधा जोशी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय महाजन, धनश्री गुंफेकर, मनपा शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख अरुण पालवे, नगरसेवक युवराज गाडे पाटील, शिवसेना नेते काकासाहेब शेळके, सामाजिक कार्यकर्ते संपत नलवडे आदींसह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, संस्था पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी व माजी मुख्याध्यापक उपस्थित होते.
वाद्यांच्या गजरात आणि पुष्पवर्षावाच्या वातावरणात जोशी मॅडम यांचे प्रशालेत आगमन झाले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या शास्त्रीय नृत्यातून व स्वागतगीताच्या माध्यमातून त्यांचे अनोखे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक करताना प्रशालेचे पर्यवेक्षक सुनील कानडे यांनी प्राचार्या जोशी यांच्या नियोजनशक्ती, प्रशासनकौशल्य आणि शैक्षणिक बांधिलकीचा गौरव केला.
मानपत्राचे वाचन सौ. अस्मिता कुलकर्णी यांनी केले. दोन्ही शाखांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन प्राचार्या जोशी यांचा सत्कार केला. उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षिकांनी सादर केलेले जरा विसावू या वळणावर… हे स्वरचित गीत उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारे ठरले.
प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक बी. गायकवाड, राशिनकर, सौ. शास्त्री, सौ. अंबाडे, सौ. केसकर, श्री. लोंढे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. निलेश कुलकर्णी यांनी जोशी मॅडम यांच्या सेवाभावी वृत्तीचा गौरव केला. विद्यार्थ्यांनीही कवितांमधून आणि मनोगतातून मॅडमविषयीची आपुलकी व्यक्त केली. माजी मुख्याध्यापक श्री. कासार व अत्रे मॅडम यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेचे पदाधिकारी श्रीपाद कुलकर्णी, संध्याताई कुलकर्णी आणि सुरेश क्षीरसागर यांनी प्राचार्या जोशी यांचा संस्थेच्या प्रगतीतील वाटा अधोरेखित करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. चि. पुष्पक जोशी यांनीही भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्या संगीता जोशी म्हणाल्या की, विद्यार्थीच केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. संस्थेचा विश्वास आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याने माझा संपूर्ण सेवाकाळ अतिशय आनंदी आणि समाधानकारक गेला. या संस्थेतील सहकारी आणि विद्यार्थी यांचे ऋण आयुष्यभर मनात राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत गायकवाड यांनी केले. आभार शिल्पा कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख अरुण राशिनकर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला. 33 वर्षांच्या अखंड ज्ञानसेवेच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी संगीता जोशी मॅडम यांना निरामय, सुखी व समाधानकारक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. मॅडमच्या नेतृत्वाखाली विकसित झालेल्या शैक्षणिक संस्कारांची परंपरा श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेमध्ये पुढेही कायम राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
