आंदोलनाच्या सहाव्या दिवशी हलगी व ताशांचा गजर करून प्रशासनाचे वेधले लक्ष
चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा पंचायत समितीत घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत सकल मातंग समाज व लहू सैनिक यांच्या वतीने जिल्हा परिषदेत सुरु असलेले आक्रोश आंदोलन सोमवारी (दि.15 सप्टेंबर) सहाव्या दिवशीही सुरूच होते. या आंदोलनादरम्यान हलगी व ताशांचा गजर करून आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले, तर जोरदार घोषणाबाजीने जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडले.
रामदास मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात सुनील शिंदे, उत्तम रोकडे, प्रवीण कुमार शेंडगे, सुखदेव फाजगे, संभाजी फाजगे, मधुकर सकट, बाळासाहेब बुलाखे, लखन साळवे, संतोष उमाप, सीताराम शिरसाठ, नवनाथ शिंदे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलकांनी पंचायत समितीवर गंभीर आरोप करताना सांगितले की, गेल्या चार वर्षांत मंजूर झालेल्या घरकुलांची संख्या, प्रत्यक्ष लाभार्थ्यांची माहिती, तसेच जागा नसलेल्या व्यक्तींना देण्यात आलेली घरकुले या सर्वांचा सखोल तपास व्हावा. घरकुल मंजुरीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांकडून सर्रास पैसे उकळले, असे धक्कादायक आरोप या वेळी करण्यात आले.
प्रत्येक हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी देखील आर्थिक व्यवहार झाले, असा ठपका ठेवत लहुजी शक्ती सेनेने उच्चस्तरीय समिती नेमून प्रत्येक लाभार्थ्यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी, यासाठी आंदोलनक ठाम आहेत.
