हिंदू-मुस्लिम पलीकडे जाऊन जपलेल्या माणुसकीचा गौरव;
विश्व मानव अधिकार परिषदतर्फे सन्मान; जहागीरदार यांच्यावर “अनटोल्ड स्टोरीज कोविड 19” पुस्तकाचे प्रकाशन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या भीषण काळात धर्म-पंथ बाजूला सारुन फक्त माणुसकीला सर्वोच्च मान देत अनेकांची सेवा केलेल्या सामाजिक कार्यकर्ते साहेबान जहागीरदार यांना विश्व मानव अधिकार परिषदतर्फे भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील हज हाउसमध्ये आयोजित कार्यक्रमात हा मानाचा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात कर्नल निर्देष शहा यांच्या हस्ते जहागीरदार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. प्रविण सुर्यवंशी, डॉ. शिवाजी सुकरे (डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर), डॉ. एम.आर. अन्सारी (राष्ट्रीय अध्यक्ष, विश्व मानव अधिकार परिषद), डॉ. जी.एस. काम्बोज, डॉ. फीरोज खान,युथ प्रदेश अध्यक्ष नवेद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात साहेबान जहागीरदार यांनी कोरोना काळात केलेल्या धाडसी, निस्वार्थ आणि माणुसकीने परिपूर्ण कार्यांची नोंद असलेले “अनटोल्ड स्टोरीज कोविड 19” हे पुस्तक देखील प्रकाशित करण्यात आले. हे पुस्तक लेखक व पत्रकार सय्यद रिजवानउल्लाह यांनी इंग्रजीत संपादित केले असून महामारीच्या काळातील संकट, भीती, वेदना आणि त्यातून उभ्या राहिलेल्या मानवी संवेदनांचा हुंदका या पुस्तकातून समोर येतो.
कोरोना महामारीच्या सर्वात कठीण काळात अनेक रुग्णांचे मृतदेह हाताळण्यास स्वतःचे नातेवाईकही पुढे येत नव्हते. अशावेळी साहेबान जहागीरदार यांनी मागेपुढे न पाहता स्वतः पुढे येऊन अनेक मृतांच्या अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारली, मुस्लीम असूनही हिंदू मृतांच्या पार्थिवाला अमरधाममध्ये मुखाग्नी दिला, तसेच कब्रस्तानातही अनेकांचे दफनविधी केले. हे कार्य करत असताना आपल्या कुटुंबापासून दीड वर्ष वेगळे राहून माणुसकीचे कर्तव्य बजावले.
असंख्य गरजूंना अन्न-धान्य, आर्थिक मदत, औषधे, वैद्यकीय साहित्य पुरवले, ऑक्सिजनची टंचाई असताना जिल्हा रुग्णालयासाठी आणलेली ऑक्सिजन गाडी बंद पडल्यावर अर्ध्या रात्री स्वतः दुरुस्ती करून ती पोहोचवली, ज्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले. त्यांच्या या निस्वार्थी सेवेमुळे कोरोना काळात अनेक कुटुंबांना आधार मिळाला. अनेकांच्या नजरेआड गेलेल्या या घटनांना “अनटोल्ड स्टोरीज कोविड 19” या पुस्तकात जिवंत केले आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी जहागीरदार यांच्या माणुसकीपूर्ण सेवेचे कौतुक करत त्यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम केला. पुरस्कार मिळाल्याबद्दल साहेबान जहागीरदार यांचे अभिनंदन होत आहे.
