नागरिकांच्या अडचणींवर युवा सेनेचे शहरप्रमुख पै. महेश लोंढे व अभिजीत बोरुडे यांची तत्पर मदत
स्वखर्चाने मुरुम टाकून रस्ता केला मोकळा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिना नदीला दोनदा पूर आला. नगर-कल्याण रोडवरील नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दोनदा पूल पाण्याखाली गेल्यामुळे हा मार्ग बंद ठेवावा लागला होता.
नदीचे पाणी ओसरल्यानंतर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले, पाण्याचे डबके तयार झाले आणि संपूर्ण परिसर चिखलमय झाला. त्यामुळे प्रवाशांना व विशेषत: शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्ता बंद असल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून शहरात यावे लागत होते.
नागरिकांची समस्या लक्षात घेऊन युवा सेनेचे शहरप्रमुख पै. महेश लोंढे व अभिजीत बोरुडे यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वखर्चातून जेसीबीद्वारे रस्त्यावर मुरुम टाकण्याची कामे केली. तसेच, रस्त्यावर साचलेले मोठ्या प्रमाणातील पाणी बाजूला करून वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यात आला. यावेळी श्याम लोंढे, काका शेळके, दत्ता ठाणगे, देवेंद्र बेरड, धनेश बेनकर, नरेंद्र पगारे, यश, जालिंदर बोरुडे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या मार्गावर तातडीने उपाययोजना करून रस्ता खुला केल्याने नागरिकांनी पै. महेश लोंढे व अभिजीत बोरुडे यांचे आभार मानले. यामुळे नगर-कल्याण रोडवरील नागरिकांना शहरात सहज येणे सुलभ झाले आहे.
समाजकार्य हे जनसेवक म्हणून केले पाहिजे. नगर-कल्याण रोडवरील रस्ता, पाणी, वीज अशा मुलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला असून अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत. नदीला आलेल्या पुरामुळे व मोठ्या पुलाचे काम सुरु असल्याने रस्ता बंद झाला होता. पाणी ओसरल्यानंतर बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांच्या सोयीसाठी स्वखर्चाने मुरुम टाकून रस्ता खुला करण्यात आला आहे. -पै. महेश लोंढे (शहरप्रमुख, युवा सेना)