क्लर्क ते प्रथम वर्ग अधिकारी झालेले सय्यद यांनी साधला युवकांशी संवाद
स्पर्धा परीक्षा नशिबाचा भाग नसून, परिश्रम व जिद्दीच्या शिदोरीने यश -वसीम सय्यद
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धा परीक्षेतील यश नशिबाचा भाग नसून, परिश्रम व जिद्दीच्या जोरावर यश मिळविणे शक्य आहे. जिद्दीने जग बदलता येते, यासाठी आपल्या मधील क्षमता ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. मनात स्वप्न साकार करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण झाल्यास यश प्राप्ती नक्की होत असल्याचे प्रतिपादन नुकतेच एमपीएससी परीक्षेत यश प्राप्त करुन प्रथम वर्ग अधिकारी बनलेले वसीम सय्यद यांनी केले.

मुकुंदनगर येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत चालविण्यात येणाऱ्या व्हिजन प्लस स्टडी सेंटर येथे नुकतेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवून क्लर्क ते वैद्यकिय शिक्षण व औषधे विभागात प्रथम वर्ग मुख्य प्रशासकीय अधिकारी होण्याचा मान मिळवणारे वसीम सय्यद यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. युवकांशी संवाद साधताना सय्यद बोलत होते. यावेळी मुदस्सर शेख (पुणे), सहाय्यक अभियंता आबिद पठाण, डॉ. सईद शेख, ज्येष्ठ शिक्षक अब्दुल कादीर, स्टडी सेंटरचे संचालक ॲड. नदीम सय्यद आदींनी देखील युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी स्टडी सेंटर मध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी, परिसरातील युवक व नागरिक उपस्थित होते.
पुढे वसिम सय्यद म्हणाले की, शाळेत असताना मी सर्वसामान्य विद्यार्थी होतो. मात्र परिस्थितीची जाणीव ठेवून या परिस्थितीतून बाहेर पडायचे व आपली आणि कुटुंबाची परिस्थिती बदलायची हे स्वप्न मनाशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अपार मेहनत व कष्ट करून हे यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले. तर स्वतःमधील उनिवा ओळखून त्याला आपली शक्ती बनवा, स्वतः मध्ये जिद्द व प्रेरणा निर्माण केल्यास इतर कुणाची प्रेरणा घेण्याची गरज भासणार नाही, परिश्रम व जिद्दीने यश मिळवण्याचा संदेश त्यांनी युवकांना दिला.
ॲड. नदीम सय्यद यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांना योग्य दिशा मिळण्यासाठी मोफत व्हिजन प्लस स्टडी सेंटर चालविण्यात येते. यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षेची पुस्तके असून, त्याबद्दल तज्ञ व्यक्तींकडून देखील मार्गदर्शन घेतले जात असल्याचे सांगितले. तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्टडी सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या व्याख्यानाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी सय्यद यांना विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले.