• Tue. Nov 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘विकसित भारत युवा संसद 2026-27’ साठी नोंदणी सुरू

ByMirror

Nov 10, 2026
अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांना सहभागाचे आवाहन

युवकांनो, व्यसनमुक्त भारताचा विचार मांडण्याची संधी; जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचे आयोजन


अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांना सहभागाचे आवाहन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवकांमधील नेतृत्वगुणांना चालना देण्यासह लोकशाही मूल्ये, संविधानिक आदर्श आणि राष्ट्रनिर्मितीविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत मेरा युवा भारत (MY Bharat) यांच्या वतीने ‘विकसित भारत युवा नेता संवाद 2027’ (Viksit Bharat Young Leaders Dialogue VBYLD 2027) अंतर्गत ‘विकसित भारत युवा संसद 2026-27’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील युवक-युवतींना आपले विचार मांडण्याची विशेष संधी उपलब्ध झाली आहे.


या उपक्रमाचा मुख्य उद्देश देशातील युवकांना लोकशाही प्रक्रियेशी जोडणे, त्यांच्यात नेतृत्वक्षमता विकसित करणे आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर स्वतंत्रपणे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. युवकांनी केवळ देशाच्या विकासाचे साक्षीदार न राहता राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी व्हावे, या दृष्टिकोनातून युवा संसदेचे आयोजन करण्यात येत आहे.
देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व 786 जिल्ह्यांमध्ये तीन टप्प्यांत ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचा समावेश असून, सर्व स्पर्धा प्रत्यक्ष (ऑफलाइन) पद्धतीने पार पडणार आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेतून प्रत्येक जिल्ह्यातील तीन उत्कृष्ट स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाईल. त्यानंतर राज्यस्तरावर निवडलेले तीन स्पर्धक राष्ट्रीय स्तरावर आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धेसाठी ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ (Nashamukt Yuva for Viksit Bharat) हा महत्त्वपूर्ण विषय निश्‍चित करण्यात आला आहे. आजच्या तरुण पिढीसमोर व्यसनाधीनतेचे वाढते आव्हान लक्षात घेता, व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी युवकांची भूमिका काय असावी, व्यसनांपासून तरुण पिढीला दूर ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येतील आणि विकसित भारताच्या संकल्पनेत व्यसनमुक्त युवकांचे योगदान कसे महत्त्वाचे ठरू शकते, यावर स्पर्धकांना आपले विचार मांडता येणार आहेत.


या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी तीन मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, स्पर्धकांना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या तीन भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत आपले विचार मांडता येतील. त्यामुळे मातृभाषेतून प्रभावीपणे आपली भूमिका मांडण्याची संधीही युवकांना मिळणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी युवक-युवतींचे वय 18 ते 25 वर्षे असणे आवश्‍यक आहे. वयोमर्यादा निश्‍चित करण्यासाठी 17 ऑगस्ट 2026 ही कट-ऑफ तारीख ठरविण्यात आली आहे. पात्र युवक-युवतींनी MY Bharat च्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक आहे. स्पर्धेचे नियम, पात्रता आणि इतर मार्गदर्शक सूचनांची माहितीही पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


विकसित भारत युवा संसद हा केवळ वक्तृत्वाचा उपक्रम नसून युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. या माध्यमातून युवकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच तार्किक विचारशक्ती, प्रभावी संवादकौशल्य, निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि विविध मतांचा आदर करण्याची भावना विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.


व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घेणे, सामाजिक प्रश्‍नांवर सकारात्मक भूमिका मांडणे आणि देशाच्या विकासासाठी व्यावहारिक उपाय सुचविणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण हेतू आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेरा युवा भारत, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
इच्छुक स्पर्धकांनी MY Bharat च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करावी. स्पर्धेसंदर्भातील अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी 9225776995 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, अहिल्यानगर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *