• Sat. Nov 7th, 2026

Mirrornews24

Marathi News

फटाक्यांचा धूर नको; निसर्गाचा श्‍वास जपूया! निमगाव वाघात फटाकेमुक्त दिवाळीची शपथ

ByMirror

Nov 7, 2026
फटाक्यांचा धूर नको; निसर्गाचा श्‍वास जपूया! निमगाव वाघात फटाकेमुक्त दिवाळीची शपथ

शहीद जवानांच्या स्मारकासमोर पर्यावरण रक्षणाचा संकल्प; निमगाव वाघात फटाकेमुक्त दिवाळीचा जागर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फटाक्यांचा धूर, ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाची हानी टाळून निसर्गपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देत निमगाव वाघा (ता. नगर) येथे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. शहीद जवान गोरख नाना जाधव यांच्या स्मारकस्थळी हा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि पै. नाना डोंगरे व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ, युवक-युवती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाकेमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.


सध्या परिसरात दुष्काळाचे सावट असून पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत आहे. त्यातच वाढते वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. सण-उत्सव साजरे करताना निसर्गाचेही भान ठेवणे काळाची गरज बनली आहे. दिवाळीचा आनंद फटाक्यांच्या आवाजात नव्हे, तर दिव्यांच्या प्रकाशात, आपुलकीत आणि सामाजिक बांधिलकीत शोधला पाहिजे, हा विचार या उपक्रमातून मांडण्यात आला.


संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना फटाकेमुक्तीची शपथ दिली. फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पशुपक्ष्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने दिवाळी साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश यावेळी देण्यात आला.


देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या स्मृतीला अभिवादन करत समाजाप्रती आणि पर्यावरणाप्रती आपले कर्तव्य जपण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी भाऊसाहेब जाधव, बापू सुंबे, पोपट भगत, रमेश कुलट, राजू डोंगरे, बाळू जाधव, उत्तम निमसे, नवनाथ जाधव, भागचंद जाधव, बापू पुंड, हुसेन शेख, बाबूभाई शेख, अजय फलके, संदीप डोंगरे, किरण ठाणगे, राजू शिंदे, भाऊ होळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *