परिस्थिती बदलण्यासाठी युवक-युवतींनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श समोर ठेवावा -डॉ. पारस कोठारी
रात्रशाळेतील विद्यार्थ्यांनी गिरवले सुंदर हस्ताक्षर, हस्तकला व व्यक्तिमत्व विकासाचे धडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळ संचलित ज्युनियर कॉलेज व भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरइंग युथ यांच्या सहकार्याने रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधार व व्यक्तिमत्व विकासावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेचे उद्घाटन पेमराज सारडा कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन तथा नाईट हायस्कूलचे माजी चेअरमन डॉ. पारस कोठारी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन प्रा. ज्योतीताई कुलकर्णी, रोटरी ई क्लबचे प्रकल्पप्रमुख डॉ. बिंदू शिरसाठ, प्राचार्य सुनील सुसरे, गजेंद्र गाडगिळ, सौ. वृषाली साताळकर, कार्यशाळेच्या प्रशिक्षिका व सखाराम मेहत्रे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा कदम, तसेच दादासाहेब रूपवते विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक महेंद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक करताना प्राचार्य सुनील सुसरे म्हणाले की, भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर त्यांचा सर्वांगीन विकास घडविला जात आहे. फक्त पुस्तकी ज्ञान देऊन न थांबता, त्यांना जीवनात सक्षमपणे उभे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यासाठी विविध प्रकल्प राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. पारस कोठारी म्हणाले की, परिस्थिती बदलण्यासाठी युवक-युवतींनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श समोर ठेवावा. बिकट परिस्थितून आलेले कलाम सर्वोच्च राष्ट्रपती पदा पर्यंत पोहचले. समाजाला त्यांनी प्रेरक विचार दिले. त्यांच्या आयुष्यातील यश हे शिस्त, ज्ञान आणि मेहनतीचे प्रतीक आहे. राष्ट्रपती असूनही त्यांनी वैयक्तिक संपत्ती नव्हती; त्यांची खरी संपत्ती म्हणजे ज्ञान आणि विचारसंपदा होती. रात्रशाळेतील विद्यार्थीही याच मार्गावर चालून यशस्वी होतील. हस्ताक्षर हे व्यक्तीचे व्यक्तिमत्व दाखवते. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर आणि शिस्तबद्ध होणे म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा एक भाग आहे. मेहनतीशिवाय यशाला पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
रात्रशाळेच्या चेअरमन प्रा. ज्योतीताई कुलकर्णी यांनी शाळेत राबविल्या जात असणारे विविध उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शैक्षणिक प्रगती करावी असे आवाहन केले.
कार्यशाळेच्या प्रशिक्षिका मनीषा कदम यांनी विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधार तंत्र, आकर्षक स्वाक्षरी लेखन, वारली पेंटिंग, हस्तकला, मायक्रो बिझनेस या विषयांवर सखोल माहिती दिली. तसेच व्यक्तिमत्व विकास व आत्मविश्वास वृद्धी यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत शिकलेल्या कलाकृतींचे प्रदर्शनही भरविण्यात आले, ज्याला उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी गजेंद्र गाडगिळ व वृषाली साताळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले. आभार सौ. वृषाली साताळकर यांनी मानले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक महादेव राऊत, उज्वला साठे, मंगेश भुते, अशोक शिंदे, अमोल कदम, शिवप्रसाद शिंदे, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, स्वाती होले, अनुराधा दरेकर, वैशाली दुराफे, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे आदी उपस्थित होते.

