पारंपारिक वधुच्या वेशभुषेत मॉडेल्सचा रॅम्प वॉक
महिलांना ब्युटी क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी -विद्या सोनवणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्री ज्योती महोत्सवात ब्रायडल टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध पारंपारिक वधूंच्या वेशभुषेत अवतरलेल्या युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले. अहिल्या फाऊंडेशन व उडाण फाऊंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास युवतींसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या टॅलेंट शोमध्ये मेकअप आर्टिस्ट यांनी आपल्या मॉडेल्सना वधूंच्या पारंपारिक वेशभुषेत सजविल्या होत्या. वधूंच्या वेशभुषेत वधूंनी रॅम्प वॉक करून विविध कलागुण सादर केले. नृत्य, अभिनयासह विविध कलेचे सादरीकरण केले. काहींनी लावणी देखील सादर केल्या. या स्पर्धेत 80 पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाल्या होत्या.

मेकअप आर्टिस्ट विद्या सोनवणे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सुहास सोनवणे, अहिल्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा मेकअप आर्टिस्ट कावेरी कैदके, उडान फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे, सुवर्णा कैदके, कल्याणी गाडळकर आदींसह महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विद्या सोनवणे म्हणाल्या की, सौदर्याबाबत युवतींमध्ये जागरुकता निर्माण झाली असून, युवती सुंदर दिसण्यासाठी काळजी घेत आहे. ब्युटी क्षेत्रात चांगले करिअर असून, हे क्षेत्र महिलांसाठी रोजगारांचे सर्वोत्तम साधन बनले असल्याचे त्यांनी सांगितले. कावेरी कैदके म्हणाल्या की, फक्त सुंदर दिसणे म्हणजे सौंदर्य नसून, त्या युवतींमधील कलागुण देखील अधिक सौंदर्य खुलवत असते. नवनवीन तंत्रज्ञानाच्या युगात ब्युटी क्षेत्रात झपाट्याने बदल घडत असून, युवतींनी नवनवीन तंत्र अवगत करुन या क्षेत्रात पुढे जाण्याचे सांगितले. तर या स्पर्धेच्या माध्यमातून सौंदर्य व उत्तम कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अनिता दिघे यांनी केले. आभार आरती शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयश्री शिंदे, तनीज शेख, दिनेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.