बुरूडगाव पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान
जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सौ. सालीमठ यांचे दिंडीतील महिलांसह फुगड्यांचा फेर
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बुरुडगाव (ता. नगर) येथील श्री क्षेत्र बुरूडगाव पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरला आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले. गावात सकाळी ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजराच्या भक्तीमय वातावरणात डोळे दिपवून टाकणारा अश्वरिंगण सोहळा पार पडला. वैष्णवांच्या मेळ्यातून माऊली… माऊली… च्या गजरात पालखी भोवती धावलेल्या अश्वाने डोळ्यांचे पारणे फेडले. वारकऱ्यांना सर्वाधिक सुविधा पुरवणारी दिंडी म्हणून या दिंडीकडे पाहिले जाते.

प्रारंभी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दिंडीतील रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी मिनाक्षी सालीमठ, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते, दिंडी नियोजन समितीचे डॉ. संतोष यादव, किशोर कुलट, बापू औताडे, जालिंदर कुलट, राजू पवार, फारूक शेख, शनी तांबे, अक्षय लगड, दिगंबर कर्डिले, शिवाजी मोढवे, नवनाथ मोकाटे, रावसाहेब जाधव, सचिनशेठ धांडे, ह.भ.प. दिपक महाराज भवर, ह.भ.प. गोवर्धन कमिनसे, ह.भ.प. कार्तिक शिंदे, जिल्हा परिषदेचे कासार, बुरूडगावचे माजी सरपंच बापू कुलट, तलाठी आगळे, ग्रामसेवक शेळके, विशाल पवार, आय लव्ह नगरची टीम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरुडगाव, जनजीवन माध्यमिक विद्यालय बुरुडगावचे शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, बुरूडगाव पायी दिंडीत वारकऱ्यांना विविध सोयी-सुविधा देऊन एक आदर्श दिंडी म्हणून या दिंडी सोहळ्याने ख्याती प्राप्त केली आहे. वारकऱ्यांचा विमा हा अभिनव उपक्रम इतर दिंडी सोहळ्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे स्पष्ट करुन वारीसाठी ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या पत्नी सौ. मिनाक्षी सालीमठ यांनी वारकऱ्यांना शबनम बॅग दिल्या. यापुढेही आपल्या हातून पांडुरंगाची सेवा घडो असे भावपूर्वक म्हणाल्या. विभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिंडीला नगर हद्दीपर्यंत सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले.
पारंपारिक वाद्यांच्या गजरात गावात दिंडीची प्रदक्षिणा मारण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सौ. सालीमठ यांनी देखील दिंडीतील महिलांसह फुगड्यांचा फेर धरला होता. दिंडीच्या स्वागतासाठी महिलांनी घरासमोर सडा-रांगोळी टाकली होती. दिंडीच्या अग्रभागी शालेय विद्यार्थी भगवे ध्वज व लेझिम घेऊन सहभागी झाले होते. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करणारे झेंडेकरी, टाळकरी, भजनी मंडळी, फुलांनी सजवलेले रथ व डोक्यावर तुळशी, कळस घेतलेल्या महिला दिंडीत सहभागी झाल्या आहेत. दिंडीतील रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

दिंडीचे हे सातवे वर्ष असून, यावर्षीच्या दिंडीत पाचशे गावातील वारकरी मोठ्या भक्तीभावाने सहभागी झाले आहेत. ह.भ.प. लक्ष्मण महाराज शास्त्री, ह.भ.प. योगेश महाराज यांच्या आशीर्वादाने व ह.भ.प. दीपक महाराज भवर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. समस्त ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्यास स्वइच्छेने वर्गणी व उपयोगी साहित्य देऊन दिंडीला शुभेच्छा दिल्या. दिंडीतील महिलांना साड्या व पुरुषांना कापडी पिशव्यांची भेट देण्यात आली. तर उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या वतीने वारकऱ्यांना टाळ देण्यात आले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दिंडीच्या माहिती पुस्तिकाचे प्रकाशन करण्यात आले.