• Mon. Jul 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात राजमाता जिजाऊ दिवाळी पाडवा साजरा

ByMirror

Nov 5, 2024
लोकशाही बुकात लोककल्याणकारी योजनांच्या प्रस्तावची नोंद

लोकशाही बुकात लोककल्याणकारी योजनांच्या प्रस्तावची नोंद

लोकसंख्येच्या विस्फोटाला खतपाणी घालणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांच्या प्रतिमेवर शेणलाडूचा मारा

नगर (प्रतिनिधी)- शहरातील हुतात्मा स्मारकामध्ये पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने राजमाता जिजाऊ दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला. प्रारंभी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन लोकशाही बुकची पूजा करुन त्यामध्ये लोककल्याणकारी योजनांच्या प्रस्तावची नोंद करण्यात आली. देशासाठी घातक ठरत असलेल्या लोकसंख्येच्या विस्फोटाला खतपाणी घालणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांच्या प्रतिमेवर शेणलाडूचा मारा करण्यात आला. तर या विधानसभा निवडणुकीत सत्तापेंढारी यांना पाडून चांगले उमेदवार निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.


दरवर्षी संघटनांच्या वतीने राजमाता दिवाळी पाडवा लोकाभिमूख कार्यक्रमाने साजरा केला जातो. यावर्षी लोककल्याणकारी योजनांचा प्रस्ताव लोकशाही बुकाच्या माध्यमातून सरकारपुढे मांडण्यात आला आहे. तर ही लोकशाही बुक निस्वार्थ भावनेने सामाजिक योगदान दिलेले दिवंगत उद्योजक स्व. रतन टाटा यांना समर्पित करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे लोकशाही दिवाळीचे सूत्र कार्यकर्त्यांनी राबवले आहे. या कार्यक्रमात ॲड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, वीर बहादूर प्रजापती, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, जयेश देवळालीकर, बबलू खोसला, अशोक भोसले, रईस शेख, अशोक भोसले, दिलीप जाधव, पोपट भोसले, उल्हास जगधने, मोहसीन पठाण, अरुण खिची, समीना पठाण, दिलीप जाधव, कारभारी गायकवाड, मीराताई सरोदे, मालन मंझरी, रिता ससाणे, इमामबी शेख, आशाबाई सरोदे, आनंदा आढाव आदींसह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


लोकशाही बुकामध्ये देशातील दोन कोटी घरकुल वंचितांना परवडणारी घरे देऊ शकणाऱ्या लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर तंत्राची नोंद करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षे सातत्याने डांगोरा पेटवलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नगरच्या 20 हजार नागरिकांची यादी अनेक वर्षे पडून आहे. परंतु त्यामध्ये एकाला देखील केंद्र किंवा राज्य सरकारला घर देता आले नाही, याची खंत देखील या लोकशाही बुकात नोंदविण्यात आली.
ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न सोडविण्यामध्ये भारत नक्कीच जगाचे नेतृत्व करू शकेल. त्यासाठी रेनगेन बॅटरी व ग्रीनगेन बॅटरी याचा आग्रह देखील या लोकशाही बुकामध्ये नोंदविण्यात आला. निसर्गाने जमिनीच्या खालच्या मुरमाड किंवा सच्छिद्र खडकामध्ये पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था केली आहे. परंतु भारतात शेतीमशागतीबरोबर भूजल मुरविण्याची शेतकऱ्यांमध्ये आणि लोकांमध्ये आवड नसल्यामुळे सर्वत्र शेतीचे वाळवंट होत असल्याची नोंदही यावेळी करण्यात आली.


एकात्मिक ज्ञान सिद्धांतातून संपूर्ण मानव जातीचे कल्याण होऊ शकते. जात, धर्म, पंथ मानवनिर्मित बाबी या सिद्धांतामुळे नष्ट होणार आहे. कालच्यापेक्षा आजचा माणूस अधिक उन्नत चेतनेचा नक्कीच होऊ शकेल. त्यातून सर्व सजीवांबरोबर मानव जातीचे कल्याण देखील होणार आहे. विज्ञान, तत्त्वज्ञान, सायन्स, कॉन्टम फिजिक्स, तर्कशास्त्र, गणित या सर्व वैज्ञानिक बाबींपेक्षाही श्रेष्ठ असा असलेला एकात्मिक ज्ञान सिद्धांत आहे. परंतु जगातील किंवा भारतातील कोणत्याही विद्यापीठात या सिद्धांताचा गंध देखील शैक्षणिक तज्ञांना नाही. विश्‍वामध्ये चेतना ही अभौतिक तर ऊर्जा या भौतिक बाबी असून, त्यांच्या एकात्मिक द्वैत कार्यातून हा सिद्धांत विकसित झाला आहे. त्यामुळे यापुढे अध्यात्म आणि विज्ञान यांचा संकर यातून नक्की बदल घडू शकेल याची नोंद लोकशाही बुकात नोंद करण्यात आली असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


प्रकाश थोरात म्हणाले की, लोकसंख्येचा विस्फोट ही देशापुढे गंभीर प्रश्‍न असून, यामुळे देशाच्या विकासाला मर्यादा येत आहे. मात्र देशातील मोठे नेते असलेले चंद्रबाबू नायडू यांनी लोकसंख्या वाढविण्यासाठी केलेले वक्तव्य देशासाठी घातक आहे. त्यांनी लोकांनी जादा अपत्यांना जन्म द्यावा, असा आग्रह धरून भारतातील झोपडपट्टया, गुन्हेगारी, बेरोजगारी, निवाऱ्याचा अभाव याला अप्रत्यक्षरीत्या चालना दिली असून, नेत्यांनी चूकीच्या गोष्टी बरळण्यापेक्षा जनतेच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक सब्बन यांनी सरकारने स्वत:चा अजेंडा राबवण्यापेक्षा जनतेच्या भावना व प्रश्‍न लक्षात घेऊन काम करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *