फ्लड लाईटमध्ये रंगणार आठवडाभर क्रिकेटचा थरार; पंचक्रोशीतील संघांचा सहभाग
ग्रामीण भागातील खेळाडूंना स्पर्धेद्वारे प्रोत्साहन मिळणार -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा (ता. नगर) येथे राजेंद्र शिंदे प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित राजेंद्र शिंदे चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. ही स्पर्धा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली असून, प्लास्टिक बॉलवर आणि फ्लड लाईटच्या उजेडात आठवडाभर क्रिकेटचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत पंचक्रोशीतील संघांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सागर कापसे, अनिल डोंगरे, किरण जाधव, अतुल फलके, दादा गायकवाड, मोहसिन शेख, वैभव पवार, संग्राम केदार, ऋषी जाधव, सुरज उधार, अन्सार नसीर शेख, भरत फलके, कचरु कापसे, प्रकाश गायकवाड, रेहान शेख, सुधीर शिंदे, अभि पाचारणे, भरत बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच उद्योजक गणेश जाधव, दिपक काळे, अर्जुन काळे, मयूर काळे यांच्यासह परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळणार आहे. खेळामुळे युवकांमध्ये संघभावना, शिस्त व निरोगी जीवनशैली विकसित होते. अशा स्पर्धा सातत्याने आयोजित होणे गरजेचे असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक 41 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 31 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 21 हजार रुपये व चतुर्थ पारितोषिक 11 हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ द टुर्नामेंट, सलग तीन षटकार, सलग तीन चौकार यांसह विविध वैयक्तिक कामगिरीसाठी आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या क्रिकेट स्पर्धेमुळे निमगाव वाघात युवकांमध्ये उत्साह संचारला असून, रात्रीच्या वेळेस फ्लड लाईटमध्ये होणाऱ्या सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक गर्दी करत आहेत.
