उदारीने मालाची खरेदी करण्यासाठी दिला होता धनादेश
नगर (प्रतिनिधी)- धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस 4 महिने साधी कैद व 5 लाख रुपये रकमेचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.
फिर्यादी समीर गंजूभाई शेख यांच्याकडून आरोपी अली अब्दुल रहेमान चाऊस यांनी उदारीने मालाची खरेदी केली होती. सदर मालाच्या बाकी रकमेपोटी आरोपी यांनी एचडीएफसी बँक अहमदनगर शाखेचा 3 लाख रुपयांचा धनादेश फिर्यादीला दिला होता. सदरचा धनादेश निश्चित वटेल अशी खात्री आरोपी यांनी फिर्यादीस दिल्याने सदरचा चेक फिर्यादी यांनी त्यांच्या खात्यात भरला असता, तो न वटता परत आला. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीविरुद्ध अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी कोर्ट नंबर 19 यांच्या कोर्टात निगोशियल इन्स्टुमेंट चे कलम 138 नुसार दावा दाखल केला होता.
आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे फिर्यादी यांचा कोणताही व्यावहारिक संबंध नव्हता. त्याचे चेक सन 2015 साली हरवले होते व त्याचा गैरवापर करून फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केली आहे. सदर फिर्यादीची गुणदोषावर चौकशी करून आरोपीस धनादेश न वटल्याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी.डी. कर्वे यांनी चार महिने साधी कैदेची शिक्षा तसेच रक्कम रुपये 5 लाख 3 हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम भरण्यास कसूर केल्यास आरोपीस 15 दिवसाची साधारण कारावासाची शिक्षा, तर फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून 5 लाख 3 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या वतीने ॲड. अतुल गुगळे व ॲड. उद्धवराव चेमटे यांनी कामकाज पाहिले.