• Sat. Feb 8th, 2025

कौटुंबिक न्यायालयात पथनाट्यातून सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा जागर

ByMirror

Sep 28, 2024

स्वच्छता व पर्यावरणाच्या प्रश्‍नावर सर्वांनी दक्ष रहावे -न्यायाधीश संगीता ना. भालेराव

अहमदनगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरणाच्या प्रश्‍नावर सर्वांनी दक्ष रहावे. प्रत्येकाने स्वच्छतेची सुरुवात स्वत:चे घर व परिसरापासून केल्यास संपूर्ण शहर स्वच्छ होणार आहे. पर्यावरणाच्या प्रश्‍नावर जागृक राहून समाजात जागृकता निर्माण करावी. पर्यावरण व स्वच्छतेसाठी शासन जबाबदारी पार पाडत असून, नागरिकांनी देखील कर्तव्य म्हणून योगदान देण्याचे आवाहन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता ना. भालेराव यांनी केले.


स्वच्छता हीच सेवा उपक्रमातंर्गत कौटुंबिक न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वच्छता अभियानानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून सार्वजनिक स्वच्छेतेची जागृती करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश भालेराव बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीश समीना खान, कामगार न्यायालयाचे (द्वितीय) न्यायधीश ए.जी. देशमुख, सहकार न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. लखोटे, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, कार्याध्यक्ष ॲड. शिवाजी सांगळे, सचिव ॲड. राजेश कावरे, माजी अध्यक्ष शिवाजी कराळे पाटील, सीएसआरडी महाविद्यालयाच्या वैशाली पठारे, सॅम्युअल वाघमारे, माजी उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. ज्ञानेश्‍वर दाते, ॲड. पी.डी. म्हस्के, ॲड. शिवाजी डमाळे, ॲड. करुना शिंदे, ॲड. सुजाता बोडखे, ॲड. वैशाली दाळवाले, प्रबंधक एस.के. मोहोळकर, विवाह समुपदेशक अलका राठोड, अर्चना झिंजे, शेखर मेहेत्रे, धीरज नारखेडे, सतीश राऊत, सौ. चव्हाण, एल.एस. जाधव, एस.के. जाधव, एस.बी. अळकुटे आदींसह सीएसआरडी महाविद्यालयाचे युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे भालेराव यांनी समाज जागृतीसाठी पथनाट्य प्रभावी माध्यम असल्याचे सांगून, सीएसआरडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचे कौतुक केले. प्रास्ताविकात ॲड. लक्ष्मण कचरे यांनी सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व विशद करुन पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी भूमिका घेण्याचे स्पष्ट केले.


सीएसआरडी महाविद्यालयातील ग्रामविकास अध्ययन व संशोधन केंद्रातील युवक-युवतींनी सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरणावर जागृतीवर पथनाट्याचे सादरीकरण केले. स्वच्छतेची सुरुवात माझ्यापासून या पथनाट्याचे सादरीकरण करुन सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व विशद केले. तर पर्यावरणाच्या गंभीर प्रश्‍नावर जागृती करुन झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश दिला. केली. तसेच यावेळी ॲड. शिवाजी कराळे व अर्चना झिंजे यांनी विनोदी पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश दिला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पथनाट्यातील कलाकारांना दाद दिली.


ॲड. सुरेश लगड म्हणाले की, अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याने रोगराई पसरत आहे. ही रोगराई रोखण्यासाठी व निरोगी जीवनासाठी स्वच्छता आवश्‍यक आहे. घर व परिसरापासून स्वच्छतेला प्रारंभ करण्याचे त्यांनी सांगितले. ॲड. शिवाजी कराळे पाटील म्हणाले की, सज्ञान व्यक्ती देखील सार्वजनिक ठिकाणी घाण करतात व त्यांना स्वच्छता राखण्यासाठी वारंवार सागणे, ही लज्जास्पद गोष्ट आहे. प्रत्येकाने आपला परिसर कुटुंबाप्रमाणे स्वच्छ ठेवावा. गाडगे महाराजांनी भविष्यातील गंभीर प्रश्‍न ओळखून स्वच्छतेचा संदेश देऊन मोहिम सुरु केली होती. स्वत: झाडू हातात घेऊन त्यांनी समाजाला दिलेला संदेश दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सांगळे यांनी केले. आभार सचिव ॲड. राजेश कावरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *