शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा भारतरत्न मौलाना आझाद पुरस्काराने सन्मान
नगर (प्रतिनिधी)- क्रांतिकारी शिक्षक संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रा. युनूस शेख यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बीडमध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात माजी आमदार अमरसिंह (भैय्या) पंडित, संस्थेचे संस्थापक सचिव शाहिद कादरी, बीडचे माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे आधीसभा सदस्य प्रा. नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रा. शेख यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रा. युनुस शेख जामखेड येथील ॲग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक असून, शैक्षणिक क्षेत्रात योगदान देऊन भावी पिढी घडविण्याचे कार्य करत आहे. शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. मुप्टा उर्दू शिक्षक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी ते सांभाळत आहे. तसेच गरजू घटकातील शिक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. शाळा व शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
