राष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव
मैदानी खेळातून उत्तम शारीरिक क्षमता निर्माण होते -प्रा. शिवाजी विधाते
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात क्रीडा मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या मेळाव्यात खो-खो, कबड्डी, धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक आदी खेळांचे रोमांचक सामने पाहायला मिळाले.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रीडा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मैदानावर झालेल्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोफ्लदवला. या स्पर्धांचे बक्षीस वितरण राष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजी विधाते होते. यावेळी जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियन तसेच सल्लागार समिती सदस्य श्यामराव व्यवहारे, टाकळीभान स्कूल समितीचे सदस्य पंडितराव झावरे, गंगाराम बांडे, महाराष्ट्र युवक कबड्डी संघाचा कर्णधार व राष्ट्रीय खेळाडू समर्थ हिलुडे, खेलो इंडिया राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती प्राची खळेकर, तसेच मल्लखांब-योग-एरियल सिल्क प्रशिक्षिका प्राजक्ता दळवी, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर, पत्रकार सूर्यकांत वरकड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राष्ट्रीय खेळाडू समर्थ हिलुडे याने शालेय जीवनात मैदानी खेळाची सवय लागली तर जीवनात शिस्त, आरोग्य आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन एकाच वेळी विकसित होतो. प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी मैदानी खेळ नियमितपणे खेळला पाहिजे. खेळ आपल्याला हरावे- जिंकावे हे शिकवतो, पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे तो संयम, संघभावना आणि जिद्द शिकवत असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू प्राची खळेकर म्हणाल्या की, मल्लखांब हा केवळ खेळ नाही तर पूर्ण शरीराचा व्यायाम आहे. पाया पासून डोक्यापर्यंत प्रत्येक स्नायूचे व्यायाम यातून होते. विद्यार्थ्यांनी मोबाईल व स्क्रीनपासून दूर होऊन अशा प्राचीन भारतीय खेळात भाग घेतला तर ते भावी आयुष्यात अधिक सक्षम होणार असल्याचे स्पष्ट केले.
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार रुजवण्यासाठी रयत शिक्षण संस्था सातत्याने प्रयत्न करत असते. आमच्या शाळेतून अनेक विद्यार्थी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. शरद पवार यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा संस्कृती वाढविण्यास नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी संपूर्ण संस्थेत एआय-आधारित शिक्षणाचे ध्येय पुढे ठेवून विद्यार्थ्यांसाठी नवे दालन उघडले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. शिवाजी विधाते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगले आदर्श, मेहनत आणि निरोगी शरीर आवश्यक आहे. शारीरिक क्षमता उत्तम असेल तर कोणत्याही क्षेत्रात क्षमता वाढते. त्यामुळे शालेय जीवनातच मैदानी खेळाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन केले.
पाहुण्यांचे स्वागत प्राथमिकच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांनी केले. प्रास्ताविक महादेव भद्रे यांनी केले. विजेत्या खेळाडूंना स्कूल कमिटीचे सदस्य अर्जुनराव पोकळे व अंबादास गारुडकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. जी. पिसाळ यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एम. गारुडकर, उर्मिला साळुंके, शालेय क्रीडा प्रमुख पी. आर. पालवे, मीनाक्षी खोडदे यांनी परिश्रम घेतले.
