दिव्यांग बांधवांसाठी निस्वार्थ भावनेने सुरु असलेल्या पुंड यांच्या कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग बांधवांना प्रवाहात आणण्याचे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय बाबूराव पुंड यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दिव्यांग मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी पुंड यांच्या पुरस्काराची घोषणा केली.
शिक्षक दिनाचे औचित्यसाधून दि.3 सप्टेंबर रोजी नवोदित कवी व नामवंत कवींचे दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन नगर-कल्याण रोड, बायपास चौक (नेप्ती) येथील अमरज्योत लॉन येथे रंगणार आहे. या संमेलनात पुंड यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर यावेळी सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसह सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत.
संजय पुंड प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा सहसचिव आहेत. ते स्वत: दिव्यांग असून, दिव्यांग बांधवांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. दिव्यांगांचे शासनस्तरावर प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरु असतो. तर दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम ते राबवित आहे. दिव्यांग बांधवांसाठी सुरु असलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.