अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या संघर्षमय जीवन प्रकट करणारा कवयित्री सरोज आल्हाट लिखित अनन्यता काव्य संग्रहास स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कवयित्री शांता शेळके उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर करण्यात आला.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पाचव्या काव्य संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. या काव्य संमेलनात पाहुण्यांच्या हस्ते आल्हाट यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती काव्य संमेलनाचे आयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व सचिव मंदाताई डोंगरे यांनी दिली.
कवयित्री सरोज आल्हाट यांनी जीवनातील अनुभवातून लिहिलेल्या अनन्यता या काव्यसंग्रहातून युवक-युवतींना प्रेरणा मिळत आहे. त्यांनी यापूर्वी तीन काव्यसंग्रहाची निर्मिती केली असून, अनन्यता हा चौथा काव्यसंग्रह त्यांनी स्वत:च्या जीवनातील संघर्ष शब्दबब्ध केला आहे. हे एक प्रकारचे आत्मचरित्रात्मक काव्य आहे.
हा काव्यसंग्रह सर्वसामान्यांसाठी हुंकार भरणारा असून, यातून नवीन पिढीला ऊर्जा व उर्मी मिळत आहे. अनन्यता या काव्यसंग्रहाची दखल घेऊन त्याला कवयित्री शांता शेळके उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला असून, कवयित्री सरोज आल्हाट यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. काव्य संग्रहास पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.