• Thu. Oct 30th, 2025

वटपौर्णिमेला एकल महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांची लागवड

ByMirror

Jun 22, 2024

एकल महिलांच्या सन्मानार्थ उपक्रम

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पारंपारिक रुढी परंपरेला फाटा देत बालाजी फाउंडेशनच्या वतीने वटपौर्णिमेच्या दिवशी एकल महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांची लागवड करुन अनोख्या पध्दतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. सुवासिनी महिलांची वटपौर्णिमेनिमित्त असलेली लगबग, तर दुसरीकडे एकल महिलांसाठी घेण्यात आलेला उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला.


पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी सुवासिनी महिला मनोभावे वटवृक्षाची पूजा करतात, मात्र काही महिलांच्या आयुष्यात एकटेपणा येतो. आपला साथीदार आपल्याला अर्ध्या आयुष्यातून सोडून जातो, अशावेळी या महिला वटपौर्णिमा साजरी करत नाही. समाजात आजही एकल महिलांनी वटपूजन करणे व वडाच्या झाडाला हात लावणे या चूकीच्या रुढी परंपरा अस्तित्वात आहेत. या सगळ्या गोष्टीला छेद देत बालाजी फाउंडेशनने केडगाव येथील स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरात वटपौर्णिमेच्या दिवशी एकल महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांची लागवड केली.


या उपक्रमासाठी जगदंबा फाउंडेशन व मानव सुरक्षा सेवाचेही योगदान मिळाले. या उपक्रमात सहभागी झालेल्या वयोवृद्ध व एकल महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला. यावेळी बालाजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे, मेजर राज ठाणगे, सचिव शिवाजी उबाळे, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत पाटील शेळके, मानव सुरक्षा सेवाचे प्रकाश तांबडे, एकल महिला संघटनेच्या राज्य सचिव सुजाता गोरे, ॲड. आहिरे, झरेकर मॅडम आदी उपस्थित होते.


मेजर शिवाजी पठाडे म्हणाले की, समाजात आजही एकल महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. एकल महिलांबद्दल समाजात गैरसमज असून, या रुढी परंपरेला फाटा देऊन एकल महिलांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


पर्यावरण संवर्धनासाठी बालाजी फाउंडेशन वृक्षरोपणाच्या माध्यमातून योगदान देत आहे. प्रत्येक सण-उत्सवात वृक्षरोपणाचे उपक्रम राबविण्यात येत आहे. शंभर वर्षाचे आयुष्य असलेल्या वडाच झाडं आरोग्यदायी व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उपयुक्त असून, त्याचे अनेक फायदे असल्याचे मेजर राज ठाणगे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित असणाऱ्या सुवासिनी महिलांना वड, पिंपळ, जांभुळ आदी 100 झाडांची रोपे भेट देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *