संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
कर्तव्य म्हणून वृक्षारोपणासाठी सर्वांना हातभार लावावे -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- सातत्याने पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कै. लक्ष्मणराव देवजी बेलेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भिंगार येथील वीरशैव पट्टशाली पटणावर लिंगायत कोष्टी समाजाच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा होत असतो, ग्रुपचे सदस्य बेलेकर यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ झाडांची लागवड करुन निधन झालेल्या व्यक्तींच्या नावाने झाडे लावण्याचा उपक्रमही ग्रुपच्या वतीने सुरु करण्यात आला आहे.
या वृक्षारोपण अभियानाप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, जालिंदर बेलेकर, आदेश बेलेकर, सुभाष होडगे, रमेश वराडे, अशोक लोंढे, मेजर दिलीप ठोकळ, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, दीपकराव बडदे, मनोहर दरवडे, अशोक पराते, अविनाश जाधव, अरुण तनपुरे, अभिजीत सपकाळ, सुरेशराव उदारे, कुमार धतुरे, आप्पासाहेब हंचे, रामलिंग मेणसे, विश्वंभर कंगे, अनिलराव झोडगे, अशोक दळवी, राजेंद्र झोडगे, सुनील राऊत, दीपक राऊत, दिनकर धाडगे आदी उपस्थित होते.

तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिंगार येथील संत सावता महाराज मंदिरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन ग्रुपच्या सदस्यांनी अभिवादन केले. प्रास्ताविकात जालिंदर बेलेकर यांनी ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने वृक्षारोपण सुरु आहे. दिवंगत झालेल्या व्यक्तींच्या नावाने झाडे लावल्यास त्यांच्या स्मृती आपल्यात कायम जीवंत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय सपकाळ म्हणाले की, प्रत्येक कुटुंबातून दरवर्षी एक झाड लाऊन त्याचे संगोपन केले गेल्यास पर्यावरण संवर्धन चळवळ यशस्वी होणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षरोपणाने सुरक्षित करता येणार आहे. सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी व पर्यावरण संवर्धनाकरिता वृक्षारोपण काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर संत सावता महाराजांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्य करुन, खरा भक्ती मार्ग दाखवला. अंधश्रध्देवर प्रहार करुन, त्यांनी कर्तव्य व कर्माचे महत्त्व सांगितले. कर्तव्य म्हणून वृक्षारोपणासाठी सर्वांना हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले.