• Sat. Mar 15th, 2025

वनवा पेटलेल्या बहिरवाडीच्या डोंगरावर पुन्हा 625 झाडांची लागवड

ByMirror

Aug 4, 2024

झाडे लाऊन जगवली आणि वनवा पेटला पुन्हा त्याच ठिकाणी केले वृक्षारोपण

जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात वनवा पेटलेल्या बहिरवाडी येथील डोंगर परिसरात जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने 625 झाडांची लागवड करण्यात आली. वनवा पेटल्यानंतर अनेक झाडे जळून खाक झाली होती, त्या डोंगरावर असलेल्या खातोडी भैरवनाथ मंदिर परिसरात विविध प्रकारच्या देशी झाडे लावण्यात आली.


जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावून त्यापैकी 625 झाडे जगविण्यात आली होती. यावर्षीच्या उन्हाळ्यात डोंगरावर वनवा पेटल्याने यामधील 70 टक्के झाडे नष्ट झाली. या झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुन्हा वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी ह.भ.प. सुदाम महाराज दारकुंडे, माजी सैनिक विनायक दारकुंडे, विकास जगदाळे, काळुराम काळे, विष्णू काळे, रभाजी दारकुंडे, जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, श्रीनाथ काकडे, कारभारी गर्जे, अनिल दारकुंडे, कचरू पालवे, शाहू पालवे, साहेबराव जाधव आदी उपस्थित होते.


सुदाम महाराज दारकुंडे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी जय हिंदचे कार्य ध्येय वेडेपणाने सुरु आहे. ज्या डोंगरावर लावलेली झाडे जळाली. तेथे पुन्हा झाडे लाऊन ते डोंगर हरित करण्यासाठी घेतलेला ध्यास अभिमानास्पद आहे. फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यात सुरु असलेली पर्यावरणाची चळवळ दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.


माजी सैनिक विनायक दारकुंडे म्हणाले की, माजी सैनिकांमुळे पर्यावरण संवर्धनाची चळवळ यशस्वी होणार आहे. या चळवळीत सर्वसामान्यांनी सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. माजी सैनिक विकास जगदाळे यांनी लावलेली सर्व झाडे जगविली जाणार असून, त्याच्या संवर्धनाची जबाबदारी ग्रामस्थ व गावातील माजी सैनिक घेत असल्याचे स्पष्ट केले.


यावेळी 625 झाडांचे पंचवृक्ष लावण्यात आले आहे. यामध्ये 125 वड, 125 पिंपळ, 125 उंबर, 125 बेल व 125 लिंबाची झाडे पिंडीच्या आकारामध्ये लागवड करण्यात आलेली आहे. भविष्यात या पंचवृक्षाची ख्याती जिल्हाभर पसरणार असल्याची भावना फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी व्यक्त केली. आभार मेजर शिवाजी गर्जे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *