गड नटणार हिरवाईने; स्टेट बँक ऑफ इंडिया व जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम
निसर्गातच खरा परमेश्वर -संजय पाठक
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोल्हारच्या गडावर महादेव मंदिर परिसरात पाचशे झाडांच्या माध्यमातून निसर्गरुपी भगवान शंकराची पिंड फुलवणाऱ्या माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून यावर्षी देखील डोंगर परिसर हिरवाईने फुलविण्याच्या उद्देशाने 300 झाडांची लागवड करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय प्रबंधक कार्यालय अहमदनगर व जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
महादेव मंदिर असलेल्या डोंगर परिसरात वृक्षरोपणाने या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी संजय पाठक, सरपंच राजू नेटके, जेष्ठ सोपानराव पालवे, निवृत्त पोलिस अधिकारी शंकरराव डमाळे, आदर्श शिक्षक नामदेव जावळे, ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव पालवे गुरुजी, सरपंच बाबाजी पालवे, प्रा. प्रेमकुमार पालवे, गौरव गर्जे, किशोर पालवे, दिनकर पालवे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पालवे, सोपान पालवे, जय हिंदचे शिवाजी पालवे, रोहिदास पालवे, आजिनाथ पालवे, हरिभाऊ पालवे, भाऊसाहेब जाधव, मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे, आव्हाड सर, दिनकर पालवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

संजय पाठक म्हणाले की, निसर्गातच खरा परमेश्वर वसलेला आहे. सर्वच धर्म ग्रंथामध्ये निसर्गाला महत्त्व देण्यात आले असून, सजीव सृष्टीचे अस्तित्व निसर्गाशी जोडलेले आहे. मनुष्याला आपल्या उज्वल भवितव्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची वेळ आली आहे. माजी सैनिकांनी राबवलेली वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी पालवे म्हणाले की, जिल्ह्यातील उजाड डोंगरांगा व माळरान हिरवाईने फुलविण्याचा जय हिंदचा संकल्प असून, त्या दृष्टीने काही वर्षांपासून सातत्याने वृक्षरोपण व संवर्धनाचे कार्य सुरु आहे. कोल्हारच्या गडावर वडाच्या झाडातून भगवान शंकराची पिंड साकारली जात आहे. तर मोठ्या प्रमाणात केलेल्या वडाच्या झाडांच्या लागवडीमुळे कोल्हार गाव वडाचे गाव म्हणून ओळखला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी वडासह देशी फळझाडे, रानटी व औषधी गुणधर्म असलेल्या झाडांची लागवड करण्यात आली. प्रा. कुमार सर यांनी जय हिंदच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या वृक्ष चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. आभार चंदू नेटके यांनी मानले.
