• Fri. Jan 30th, 2026

नेत्रदान व अवयवदानाच्या जनजागृतीवर देखावे सादर करण्याचे फिनिक्सचे आवाहन

ByMirror

Sep 11, 2024

उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या मंडळास रोख बक्षिस व पुरस्काराने होणार गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवात नेत्रदान, अवयवदान व देहदानाची जनजागृती होण्यासाठी या विषयावर देखावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, या विषयांवर उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या गणेश मंडळास रोख बक्षिस व पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.


भारतात अनेक रुग्ण अवयवाच्या प्रतिक्षेत आहेत. अवयदानाच्या अनेक गैरसमजुती समाजात पसरल्या असून, या विषयावर जनजागृतीचे कार्य फिनिक्स फाउंडेशन संस्था करीत आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेकांनी मरणोत्तर नेत्रदान करुन अनेक अंधांना नवदृष्टी दिली आहे. या चळवळीचा प्रचार-प्रसार होण्यासाठी गणेशोत्सवात नेत्रदान, अवयवदान व देहदान विषयावर जास्तीत जास्त उत्कृष्ट देखावे सादर करण्याचे आवाहन गणेश मंडळांना फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

अवयवदानावर उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या गणेश मंडळास जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते बक्षिस व पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मरणोत्तर अवयवदानाने अनेक गरजूंना नवजीवदान मिळणार असून, हे पुण्याचे कार्य असल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले आहे.


गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक देखावे सादर केले जातात. मात्र लोकांमध्ये नेत्रदान व अवयवदानाची जागृती होण्याची गरज आहे. देशात अनेक दिव्यांग बांधव विविध अवयवांच्या प्रतिक्षेत असून, अवयव कोणत्याही प्रकारे कृत्रिमरित्या तयार होत नाही. मरणोत्तर अवयव दानातूनच गरजूंना ते अवयव मिळणार असून, यासाठी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे. -जालिंदर बोरुडे (संस्थापक अध्यक्ष, फिनिक्स सोशल फाउंडेशन)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *