67 ज्येष्ठांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी
नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने नागरदेवळे (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरातून तब्बल 67 ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाली आहे. पुणे येथील के.के. आय. बुधराणी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर हे नागरिक नुकतेच शहरात परतले.
शहरात परतल्यानंतर या ज्येष्ठ नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले. शस्त्रक्रियेनंतर नवदृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
जालिंदर बोरुडे यांनी सांगितले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दृष्टीहीन रुग्णांसाठी फिनिक्स फाऊंडेशनची ही मोहीम मोठा आधार ठरत आहे. दर महिन्याला शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांना पुणे येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवले जाते. या उपक्रमामुळे अनेकांना डोळ्यांना नवदृष्टी मिळत आहे.
या शिबिराच्या माध्यमातून नेत्रदान व अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती बोरुडे यांनी दिली. समाजातील गरजू घटकांना आरोग्याच्या स्वरूपात मदत मिळावी यासाठी फाऊंडेशनकडून सातत्याने उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.